मुंबई : भारतीय रेल्वेत विजेवर धावणाऱ्या लोकलच्या युगाला शुक्रवारी ३ फेब्रुवारी रोजी तब्बल ९८ वर्षे पूर्ण झाली.
तेव्हाच्या व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) आणि आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून कुर्ल्यापर्यंत ३ फेब्रुवारी १९२५ रोजी विजेवर पहिली चार डब्यांची लोकल धावली होती. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी केवळ चार डबे घेऊन धावलेल्या या लोकलचा वेग ताशी ५० मैल इतका होता. त्यावेळी चार डब्बे लाकडी बनावटीचे होते. त्यात मध्ये लोखंडाचा देखील वापर केला होता. मध्य रेल्वेला आधी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे ही कंपनी चालवायची. याच कंपनीने ही विजेवर धावणारी लोकल चालवली होती. तेव्हाच्या वृत्तपत्रात भारतात एका प्रदूषणरहित नवीन युगाची सुरुवात, अशा मथळ्याखाली बातम्या छापून आल्या होत्या. त्यानंतर १९२७ सालापासून मेन लाईन आणि हार्बर मार्गावर ८ डब्यांच्या लोकल धावू लागल्या. हार्बर मार्गावरील ओव्हर हेड वायरमधून पूर्वी १५०० व्होल्टचा (डीसी) विद्युत प्रवाह प्रवाहित होत होता. त्यात बदल करून तो २५ हजार (एसी) करण्यात आला. त्यानंतर २०१६ पासून हार्बर मार्गावर १२ डब्यांची लोकल चालविण्यात आली.
विजेवरील गाड्यांमुळे कोळसा आणि डिझेल जाळून होणारे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत झाली. हार्बर मार्गावर सध्या दिवसभरात लोकलच्या ६०८ फेऱ्या चालविण्यात येतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:27 04-02-2023
