पुन्हा राडे सुरू झाले, म्हणून सिंधुदुर्ग बदलतोय काय?; वैभव नाईकांचा भाजपला खोचक सवाल

0

कणकवली : आंगणेवाडीत भराडी मातेच्या यात्रेदिवशी भाजपाने आनंद मेळावा घेतला. तो फक्त शिवसेनेवर टीका करण्यासाठी आणि नारायण राणेंना राजकीय निरोप देण्यासाठी होता का?

या मेळाव्यासाठी’ सिंधुदुर्ग बदलतोय’ ..अशी टॅग लाईन वापरण्यात आली. म्हणजे नेमके काय? जिल्ह्यात पुन्हा राडे सुरू झाले म्हणून सिंधुदुर्ग बदलतोय काय? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेत्यांना विचारला आहे. कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

वैभव नाईक म्हणाले, आंगणेवाडीत राज्यातून लाखो भाविक येतात. मात्र, असे असताना भाजपच्या सभेमुळे भाविकांना चार पाच तास वाहतूक कोंडीमुळे त्रास सहन करावा लागला. मुळात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सभा आयोजनामुळे राणेंची असलेली नाराजी त्यांच्या बोलण्यातून जाणवली. भाजपने आमच्यावर विनाकारण टीका करत बसण्यापेक्षा हिम्मत असेल तर लगेचच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लावावी. मग मराठी माणूस कोणासोबत आहे ते नेमके समजेल असे खुले आव्हान देखील नाईक यांनी दिले.

आमच्या सरकारच्या काळातील काही रस्ते भाजपाच्या ठेकेदारांनी केले नव्हते. ते आता केले आहेत. भाजपा मेळाव्यात ५५० लोकांचा सत्कार करण्यात आला. ज्यावेळी राणे काँगेसमध्ये गेले तेव्हाही अशीच सूज काँग्रेसला आली होती. मात्र, माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकांने त्यांचा पराभव केला. भर सभेत राणे भाषण करताना मी ३० वर्षे काम केल्यामुळे एवढे लोकप्रतिनिधी तयार झाले असल्याचे वारंवार सांगत होते. तसेच मी भाजप सोडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेत बोलायला उभे राहताच फटाके वाजवण्यात आले. राणे आणि रविंद्र चव्हाण यांच्या मध्ये सुप्त वाद निर्माण झाला आहे, हे या मेळाव्याच्यावरून दिसून आले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काय केले? असे विरोधकांकडून विचारले जाते. मात्र, जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. हे काम शिवसेनेनेच केले आहे. विरोधकांनी अंगणवाडी तरी सुरू केली का? असे राणे विचारतात. मात्र, आम्ही डीफार्मसीसारखी कॉलेज सुरू केली आहेत. त्यामुळे राणेंनी जुने आरोप पुन्हा करु नयेत.

आशिष शेलार यांनी मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून २० वर्षे सत्ता भोगली आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्या लोकांना ३० कोटींचा दंड झाला त्यांनी पक्ष बदल केल्यावर तो माफ केला जातो. मात्र, दबावासाठी जिल्ह्यातील १५० डंपर चालकांना दंड केला जातो. याला काय म्हणायचे? काही वाळू व्यावसायिकांना भाजपात प्रवेश करा, म्हणून सांगितले जात आहे. आमच्यावर कमिशनचा आरोप करणाऱ्या राणेंनी त्या कामांची निविदा प्रक्रिया झालीच नाही. ही माहिती आधी घ्यावी.

माझ्या राजकीय भवितव्याबाबत काळजी नको
आमदार नितेश राणे यांनी अगोदर नाणारला विरोध केला होता. आता कमिशनसाठी व कामाच्या ठेक्यासाठी त्यांचा विरोध मावळला. असे आम्ही म्हणायचे का? आमच्यावर दबाव असूनही आम्ही पक्ष बदललेला नाही. त्यामुळे नितेश राणेंनी माझ्या राजकीय भवितव्याबाबत काळजी करु नये. असेही वैभव नाईक यावेळी म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 07-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here