तुर्की-सीरियात भूकंपाने हाहाकार, मृतांचा आकडा 5000 वर

0

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये 7.8 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप आणि आफ्टरशॉकमुळे आतापर्यंत 5000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

जगभरातील अनेक देशांनी बचाव कार्यात मदत करण्यासाठी पथके पाठवली आहेत. तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन एजन्सीने सांगितले की, आपत्कालीन सेवांचे 24,400 हून अधिक कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. मृतांची संख्या वाढू शकते, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे, कारण बचावकर्त्यांनी मंगळवारी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरू केला आहे.

लोकांनी शॉपिंग मॉल्स आणि स्टेडियममध्ये घेतला आश्रय
या भूकंपामुळे दोन्ही देशातील हजारो इमारती आणि घरे कोसळले असून, मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. लोकांनी शॉपिंग मॉल्स आणि स्टेडियम, मशिदी आणि सामुदायिक केंद्रांमध्ये आश्रय घेतला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कस्तानच्या गाझिआनटेप शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर होता.

सीरियातही अनेक लोकांचा मृत्यू झाला
मंगळवारी तुर्की अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, तुर्कीच्या 10 प्रांतांमध्ये किमान 3,381 मरण पावले, तर 20,000 हून अधिक लोक जखमी झाले. सीरियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सीरियन सरकारच्या ताब्यात असलेल्या भागात भूकंप-संबंधित घटनांमध्ये आपला जीव गमावलेल्या लोकांची संख्या 769 झाली आहे, तर सुमारे 1,450 लोक जखमी झाले आहेत.

7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
या दुर्घटनेनंतर तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी सर्वप्रथम तुर्कीला मदत करण्याची घोषणा केली. ते वैद्यकीय साहित्य आणि 60 कर्मचार्‍यांच्या शोध आणि बचाव पथकासह 50 सैनिक पाठवण्यास तयार आहेत. मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी भारतातून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे एक पथक मंगळवारी तुर्कीला रवाना झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here