केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर

0

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 19 फेब्रुवारीला दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.

त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे तीन आठवड्यांमध्ये तिसऱ्या केंद्रीय मंत्र्यांचा कोल्हापूर दौरा होत आहे. यापूर्वी जानेवारीचा पहिला पंधरवडा उलटल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे आणि नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर होते. दरम्यान, अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहतील. तसेच करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर भेट, शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत.

दुपारी त्यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयासाठी घेतलेल्या नागाळा पार्कमधील नव्या जागेत मंदिर बांधकामाचा प्रारंभ होणार आहे. त्याठिकाणीच भाजप कार्यकर्त्यांचा मेळावाही होणार आहे. सायंकाळी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून आयोजित लोकप्रवास योजनेंतर्गत होणाऱ्या मेळाव्याला ते उपस्थित राहाणार आहेत. दरम्यान, शाह यांचे कार्यक्रम होणाऱ्या ठिकाणांची पाहणी मंत्री चंद्रकांत पाटील करणार आहेत.

तीन आठवड्यांमध्ये तीन केंद्रीय मंत्री कोल्हापुरात

दरम्यान, जानेवारी महिन्यात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचाही कोल्हापूर दौरा झाला. ज्योतिरादित्य शिंदे यांचा तीन महिन्यात दुसऱ्यांदा दौरा होता. दुसरीकडे कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा कोल्हापूर बास्केट ब्रिजची पायाभरणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. कोल्हापुराला 75 ई-बस मिळवून देण्यासाठी नक्की प्रयत्न करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. नागपुरात मी सासऱ्याचेही घर तोडले, कोल्हापूरला तोडावं लागेल, पुनर्वसन करता येईल, या शहरातील रस्ते मोठे झाले पाहिजेत, शहर सुंदर झालं पाहिजे, मार्केट झालं पाहिजे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. कोल्हापूर देशातील पहिल्या तीन जिल्ह्यात पोहोचेल इतकी ताकद असल्याचेही ते म्हणाले.

दुसरीकडे, ज्योतिरादित्य शिंदे तीन महिन्यांमध्ये भाजपच्या लोकसभा मतदारसंघ प्रवास योजनेनुसार दुसऱ्यांदा दौऱ्यावर आले. यावेळी शिंदे यांनी केंद्र सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. या सर्व योजनांची जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करुन शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा, असे निर्देश दिले. यावेळी लोकप्रतिनिधींनी अमृत योजना, थेट पाणीपुरवठा योजना, पीएम किसान योजना, पीएम स्व निधी योजना, मातृ वंदना योजना या केंद्रीय योजनांबरोबरच पंचगंगा शुद्धीकरण या अनुषंगाने सूचना मांडल्या. यावेळी विविध विभागाने केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणी बाबत तसेच सद्यस्थिती बाबत पीपीटीद्वारे सादरीकरण केले.

अमृत योजनेअंतर्गतच्या पहिल्या टप्प्यात 113 किलोमीटर पाईपलाईन पैकी 65 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तरी संबंधित ठेकेदारांकडून उर्वरित पन्नास किलोमीटरचे काम 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करून घ्यावे. तसेच कोल्हापूर शहराला थेट पाणीपुरवठा योजनेच्या काम करणाऱ्या ठेकेदारांकडून वारंवार मुदतवाढ देऊ नये. अंतिम मुदत देऊन हे काम पूर्ण करून घेण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:13 08-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here