रत्नागिरी खेडशीमध्ये तरुणीचा निर्घुण खून

0

रत्नागिरी : शहरा जवळच असणाऱ्या खेडशी गावामध्ये काल रात्री दहाच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह सापडला आणि संपूर्ण रत्नागिरीत खळबळ उडाली. खेडशी चिंचवाडी येथे राहणारी मैथिली प्रवीण गवाणकर हि १७ वर्षीय युवती दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कॉलेज मधून आल्यावर रानात बकऱ्यांना चरावयास घेऊन गेली होती. सायंकाळी साडेपाचवाजता रानातून बकऱ्या परत आल्या मात्र मैथिली परत आली नाही. ग्रामस्थांनी तिचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. अखेर मैथिलीच्या वडिलांनी ग्रामीण पोलीस स्थानकात मैथिली हरवल्याची तक्रार दिली. रात्री दह्च्या सुमारास ग्रामस्थांनी पुन्हा एकदा जवळच्या जंगलमय परिसरात शोध घेतला असता मैथिलीचा मृतदेह आढळून आला.

बकऱ्या परतल्या पण मैथिली नाही

मैथिली खेडशी येथील महविद्यालयात आपले शिक्षण घेत होती. महविद्यालयातून परतल्यावर मैथिली शनिवार, रविवार वगळता नेहमी बकऱ्यांना चरावयास न्यायची. तिचा तो नेहमीचा दिनक्रम होता. मैथिलीच्या याच वाटेवर पळत ठेऊन कुणीतरी घातपात केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. मैथिलीचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला त्या ठिकाणी जाण्यासाठी दोन बांधांवरून जावे लागते. परिसरात बकऱ्यांना चरण्यासाठी पुरेपूर रान असताना इतक्या लांब बकऱ्या चरण्यासाठी मैथिली का गेली होती हा देखील एक प्रश्न आहे.

अत्यंत क्रूरपणे करण्यात आला खून

मैथिलीचा खून अत्यंत निर्दयपणे केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. मैथिलीच्या डोक्याचा भाग पूर्णपणे चेपला जाऊन मेंदूचे तुकडे आजूबाजूला पडले होते. इतक्या निर्दयपणे दगड अथवा काहीतरी डोक्यात घालून मैथिलीचा खून केला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तेथूनच मैथिलीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तर पोलिसांना घटनास्थळावरून बांधाला टेकवलेल्या दोन काठ्या सापडल्या आहेत. जवळच एक पावसाळी टोपीही पोलिसांना सापडली आहे. ती टोपी नेमकी कुणाची आहे. याची चौकशी सुरु असून तपासासाठी हि टोपी महत्त्वाची भूमिका बाजावू शकणार आहे.

परिसरातील कामगार संशयाच्या भोवऱ्यात

मैथिलीचे वडील जवळच्याच परिसरात सुसू असणाऱ्या एका बांधकामावर पाणी मारण्याचे काम करतात. या सुरु असणाऱ्या बांधकामाच्या ठिकाणी काही कामगार काम करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी यांची चौकशी देखील सुरु केली आहे

पोलिसांची संपूर्ण टीम घटनास्थळी

रत्नागिरी पोलिसांची संपूर्ण टीम आज सकाळी घटनास्थळी जाऊन या खुनाचा तपास करताना दिसून आली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश कदम, पोलीस निरीक्षक शिरीष सासने, पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्याशी चर्चा करुन त्यांना पुढील तपासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. याठिकाणी पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत पोलिसांची विविध पथके परिसरात चौकशी व शोध घेत होती. एकंदर पोलिसांची देहबोली पाहता लवकरच या खुनाचा उपगडा होऊन आरोपी पोलिसांच्या ताब्यात येईल असेच वाटत होते. यापूर्वी देखील अनेक गुन्ह्यांची उकल रत्नागिरी पोलिसांनी अत्यंत कमी वेळात केली आहे. यावेळी देखील तपासाची चक्रे वेगाने फिरवत खुनी सापडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मैथिलीच्या मोबाईल कॉलवरुन एका युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांना मिळाली महत्वाची माहिती

तपासाची चक्रे वेगाने फिरवीत पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे मात्र घटनेच्या वेळी तो देवरुख येथे गेल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. पोलिसांच्या रात्रभर केलेल्या तपासात मुलीच्या घरात देखील शोधाशोध करण्यात आली. या तपासात पोलिसांना एक औषधाचे प्रिस्क्रिप्शन सापडले असून ते जिल्हा रुग्णालयातील आयुष विभागातून देण्यात आले आहे. या प्रिस्क्रिप्शन वर लिहिण्यात आलेली काही औषधे या खुनाच उलगडा होण्यास मदतीची ठरू शकतात अशी माहिती मिळत आहे.

एकंदर १७ वर्षाच्या मैथिलीच्या खुनाने संपूर्ण रत्नागिरी हादरली असून लवकरच या खुनाचा उलगडा होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here