रस्ता चुकलेल्या महिलेला मिळाले घर

0

रत्नागिरी : खेडशी येथे निराधार भटकणाऱ्या एका तीस वर्षांच्या महिलेला सायली मालगुंडकर यांनी माहेर संस्थेत ग्रामीण पोलिस ठाणे, कारवांचीवाडी यांच्या मदतीने सहाऱ्यासाठी दाखल केले. माहेर संस्था व पोलिस यांच्या सहकार्याने या रस्ता चुकलेल्या मतिमंद महिलेला स्वतःचे घर पुन्हा मिळाले आहे.

रत्नागिरीतील निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर या संस्थेमध्ये अनाथ, निराधार, दुर्लक्षित, वंचित तसेच रस्त्यावर फिरणारे, नातेवाईक नसणारे मुले-मुली, महिला, पुरुष दाखल होत असतात. ही महिला आपले नाव व गावाचे नाव ओझर असे सांगत होती. ती थोडी मतिमंद होती. तिला आपला पूर्ण पत्ता सांगता येत नव्हता. देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर पोलिस ठाण्यात या महिलेबाबत बेपता असल्याची चौकशी करण्यात आली. तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांना तिचे फोटो पाठवण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती संबंधित महिलेच्या गावी पोहोचली.

राजापूर पोलिस ठाण्यामध्ये दोन दिवसांपूर्वी बेपत्ता नोंद असलेली ही महिला शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी बाहेर पडली होती. कार्यक्रम संपल्यानंतर घरी जात असताना ती रस्ता चुकली व तांबळवाडी, ओझर, तालुका राजापूर येथून चालत रत्नागिरी खेडशी या ठिकाणी आली. घरातील नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला व राजापूर पोलिस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल केली. ही महिला माहेर संस्था, हातखंबा रत्नागिरी येथे असल्याचे नातेवाईकांना कळले. संस्थेत येऊन तिची आई व तिचा भाऊ यांनी तिला माहेर संस्थेतून ताब्यात घेतले. आईला मुलगी व भावाला बहीण मिळाल्यामुळे सर्वांना आनंद झाला. रस्ता चुकलेल्या महिलेला तिचे घर व नातेवाईक मिळाले ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, असे माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी सांगितले. तिचे घर व नातेवाईक शोधण्यासाठी ग्रामीण पोलिस ठाणे कारवांचीवाडी, रत्नागिरी व राजापूर पोलिस ठाण्याची मदत झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 10-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here