गुवाहाटीला गेल्यामुळे माझा दर्जा वाढला : उद्योगमंत्री उदय सामंत

0

रत्नागिरी : बांधकाम विभागाला जनरल चॅम्पियनशिप मिळाली आहे, ती योग्य असल्याचे वाटते; पण एखाद्या स्पर्धेचे बक्षीस मिळाल्यावर आपली जबाबदारी वाढते.

जसे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री झाल्यानंतर अडीच वर्षे कार्यभार केला. त्यानंतर मी गुवाहाटीला गेलो. तेथून आल्यावर मला उद्योगमंत्री हे पद मिळाले. त्यामुळे गुवाहाटीहून आल्यावर माझा दर्जा वाढला. त्यामुळे तुम्हाला जनरल चॅम्पियनशीप मिळाल्यानंतर तुमचा दर्जा वाढलेला आहे, असे मत राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचे २७ वे वार्षिक स्नेहसंमेलनाचा बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्ताने ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कर्मचारी हे काम जास्त करतात. कोकणपट्टा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा रायगड येथील सर्व लाेक भावनिक आहेत. यांच्या पाठीवर हात मारून लढ म्हणून सांगितल्यास ते परत पाठी बघणार नाहीत. मात्र, हात वर केल्यास तेसुद्धा स्वाभिमानी आहेत. हा अनेक वेळा रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अनुभव आला आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्नेहसंमेलनासाठी १० लाख रुपये दिल्याबद्दल धन्यवाद दिले.

इतर जिल्ह्यामध्ये स्नेहसंमेलनासारखे कार्यक्रम अधिकाऱ्यांनी जबरदस्ती केल्यावर होतात. मात्र, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना एकदा स्नेहसंमेलन म्हटल्यावर त्यांना सांगावे लागले नाही. हा पायंडा फक्त रत्नागिरीने पाडला आहे. असे वातावरण राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात नसल्याचे यादव यांनी सांगितले, असेही सामंत म्हणाले. वामन कदम निवृत्त झाले, समीर इंदुलकर, संजय कांबळे, दिनेश सिनकर निवृत्त होतील; पण त्यांच्या नंतरच्या पिढीने हा कार्यक्रम सुरू ठेवण्याचा पण आणि निर्धार केला पाहिजे. कार्यक्रम तीन दिवसांचा छोटा असला तरी याच्यातून जी मानसिकता घेऊन जातो ती भविष्यातील एका वर्षाच्या कार्यप्रणालीवर असर करत असते, असेही ते म्हणाले.

यावेळी समीर इंदुलकर आणि त्यांच्या पत्नी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, मंडळाचे अध्यक्ष दिनेश सिनकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी सभापती महेश म्हाप, प्रकाश रसाळ, समीर इंदुलकर, संतोष गमरे, संजय कांबळे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 10-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here