भाजप स्वबळावर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार- प्रशांत डिंगणकर

0

रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणूक स्वबळावर लढण्याचा प्रस्ताव शहर भाजपने जिल्हाध्यक्षांसमोर मांडला आहे. शहराच्या ८ प्रभागांत झालेल्या भाजपच्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या भावना या स्वबळावर लढण्याच्याच आहेत. त्यामुळे शहरात सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत डिंगणकर यांनी दिली.
भाजप ही लोकशाही मानणारी संघटना आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी मिळत असते. नवे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या संघटनकौशल्य व आक्रमक, अभ्यासू, निष्कलंक व्यक्तीमत्वामुळे भाजपला बळ प्राप्त झाले आहे. त्यांच्या आगमनामुळे कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले आहेत, अशी पुष्टीही डिंगणकर यांनी जोडली. शहराच्या प्रत्येक प्रभागात बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. शहरात १५ हजारांहून अधिक सदस्य नोंदणी करण्यासाठी पदाधिकारी कामाला लागले आहेत.
डिंगणकर यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांनी निष्कंलक चारित्र्य ठेवून अनेक प्रश्न, समस्या सोडवल्या आहेत. ३७० कलम नुकतेच रद्द केले आहे. मुख्यमंत्र्यांनीही समाजातील सर्व घटकांसाठी नवनव्या योजना सुरू केल्या आहेत. या योजना पोहोचवण्याचे काम भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी करत आहेत. नवे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पटवर्धन यांच्याकडे संघटनकौशल्य चांगले असून आक्रमकता आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागलो आहोत. शहरातील ८ प्रभांगात बैठका झाल्या असून स्वत: जिल्हाध्यक्ष बैठकांना उपस्थित राहून कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. कोकणातही भाजपला यश मिळण्याकरिता कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. प्रभागाच्या बैठकांमध्ये स्वबळावरच निवडणूक लढली पाहिजे, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी जिल्हाध्यक्षांकडे प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव ते वरिष्ठांकडे पाठवतील.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांना रत्नागिरी शहरातून पाच हजार राख्या पाठवण्यात येणार आहेत. शक्ती सन्मान महोत्सवाअंतर्गत या राख्या पाठवण्यात येतील. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे माता, भगिनींना पत्र आणि योजनांची माहिती देणारे पत्रक व लिफाफा दिला आहे. मंगळवारी राख्या पाठवल्या जाणार असल्याचे डिंगणकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here