‘आत्मनिर्भर पॅकेज’कडून भ्रमनिरास; सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील पाच दिवस केंद्र सरकारचे आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले. या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये बहुतांश उद्योगांना आर्थिक मदत न मिळाल्याने उद्योगांची पुरती निराशा झाली. त्यातच करोना व्हायरसवरून चीन आणि अमेरिका या देशांमधील तणाव वाढल्याचे भांडवली बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या सत्रात बँक आणि वित्त संस्थांच्या शेअरमध्ये विक्रीचा मारा सुरु आहे. सकाळी ११.२७ वाजता सेन्सेक्स १०४५ अंकांनी कोसळला आणि ३००५२ अंकांपर्यंत खाली आला आहे. निफ्टीत ३०९ अंकांची घसरण झाली असून तो ८८२७ अंकांवर आहे. आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये ३.४४ टक्क्यांची घसरण झाली. बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, एसबीआय, इंडसइंड बँक आदी शेअर २ टक्क्यांनी कोसळले आहे. विक्रीमुळे निर्देशांकात घसरण सुरु असून, गुंतवणूकदारांचे किमान तीन लाख कोटींचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे आयटीसीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, इन्फोसिस, एचयूएल आदी शेअर तेजीत आहेत.आशियातील प्रमुख शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती पाच आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर गेला आहे. करोनाने जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. करोनाच्या संकटामुळे जपानने पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेला मंदीने ग्रासले असल्याचे कबूल केले आहे. त्याशिवाय भारताचा चालू वर्षाचा विकासदर उणे राहील, असे अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केला आहे. करोना रोखण्यासाठी सध्या सुरु असलेल्या लाॅकडाउनमुळे विमान सेवा देखील पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे सरकारकडून काही आर्थिक मदतीची अपेक्षा विमान कंपन्यांनी केली होती. मात्र याबाबत आत्मनिर्भर भारत अभिनयाअंतर्गत कोणतीच घोषणा न झाल्याने विमान कंपन्यांची निराशा झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here