मी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला; टीका केली नाही : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : ‘कोरोनाचा सामना करताना सध्याच्या नेतृत्वाकडे प्रशासकीय कौशल्याचा अभाव असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाणांनी केली. परप्रांतीय मजुरांच्या प्रवासाचा विषय आणि मुंबईत कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती योग्यरित्या हाताळण्याची गरज चव्हाण यांनी व्यक्त केली. पृथ्वीराज चव्हाणांनी केलेली टीका ऐकून संजय निरुपम यांनी ट्वीट करत चव्हाणांवर निशाणा साधला होता. ‘कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत की कोविड19 च्या संकटाला तोंड देण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार अपयशी ठरली आहे. या अपयशाला कोण जबाबदार आहे, हे त्यांनी सांगितले नाही. हे तेच चव्हाण साहेब आहेत, ज्यांनी शिवसेनेबरोबर सरकार स्थापनेचा सुवर्ण विचार मांडला होता’ अशी तोंडभर टीका संजय निरुपम यांनी केली होती. तर ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मी टीका केलेली नाही, मी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला, त्याचा अर्थ मी टीका केली असं नाही. भाजपवाले आघाडीत बिघाडी दाखवण्यासाठी तसा भ्रम निर्माण करत आहेत’ असं स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं. ‘मी प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल बोललो. प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही वेळा ग्राऊंड रिअॅलिटी माहिती नसते. त्यामुळे अधिकारी आणि मंत्री यांनी समन्वय साधून काम करावं लागतं. मात्र मुख्यमंत्री कमी पडतायेत असं मी कुठेच म्हणालेलो नाही. मी केवळ जबाबदाऱ्यांचं वाटप करता येईल असं सांगितलं होतं. त्यानुसार कामाचं वाटप करुन प्रशासकीय जबाबदारी ठरवता येईल, असं मी म्हटलं,’ असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here