सांगली | कोल्हापूर, सांगलीच्या महापूरातील काही दृश्यं ही हृदयद्रावक ठरली आहेत. त्यामध्ये एका चिमुरड्याचा मृत आईचा कुशीत मृत्यू झालेल्या फोटो. या फोटोमुळे महापूराची तीव्रता साऱ्यांच्या लक्षात आली. याच पूरातील एक व्हायरल झालेला व्हीडिओही बोलका ठरला आहे. पूरात अडकलेल्या लोकांना सैन्य दल सुरक्षित ठिकाणी पोहवताना एका महिलेला अश्रू अनावर झाल्याचं दिसलं. या महिलेला देव दिसला तो आर्मीच्या कपड्यात आणि पायात बूट घातलेला. जीवाची बाजी लावणाऱ्या भारतीय सैनिकाने तिला आणि तिच्या कुटुंबाला सुखरुप बाहेर काढलं त्यामुळे तिने कोणताही विचार न करता त्या जवानाचे पाय धरले. जवानानेही पाय मागे घेत आपलं कर्तव्य बजावलं असल्याचं सांगितलं. बोटीत बसलेले लोक आधीच पूराचं पाणी पाहून घाबरले होते. त्यात त्यांच्या बोटीला साप आडवा आलेला. तो साप बोटीत शिरला असता तर?, सापाला पाहून बोटीतले लोक हैराण झाले असते आणि बोटीत गोंधळ होऊन पाण्यात पडण्याची भिती, या साऱ्या विचारांनी घाबरुन गेलेल्या त्या माऊलीच्या चेहऱ्यावरचे भाव सगळं काही सांगून जातात.
