भारताच्या अखत्यारित असलेल्या क्षेत्रावर दावा ठोकत नेपाळने तयार केला नवा नकाशा

काठमांडू : भारताचा शेजारी देश नेपाळने नव्या नकाशाला मंजूरी दिली असून भारताच्या भागावर दावा केला आहे. लिपुलेख भागावरून नेपाळने भारताच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. या सीमा प्रश्नावरून भारत आणि नेपाळमधील संबंध ताणले जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत नेपाळने नव्या नकाशाला मंजूरी दिली. या नव्या नकाशानुसार, लिपुलेख, कालापानी, लिंपियाधुरा आदी भाग हे नेपाळमध्ये दाखवण्यात आले आहेत. हे भाग भारताकडे आहेत. नेपाळच्या आगळकीवर भारताने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. लिपुलेख या भागात भारत, नेपाळ आणि चीनची सीमा एकत्र येते. त्यामुळे या भागाला विशेष महत्त्व आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळाने मंजूरी दिलेल्या नव्या नकाशामध्ये ७ प्रांत, ७७ जिल्हे आणि लिपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानीसह ७५३ स्थानिक प्रशासन मंडळही दाखवण्यात येणार असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ज्ञावली यांनी ट्विटरवर दिली. मागील काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तराखंडमधील घाटीयाबादगड ते लिपुलेख या मार्गाचे उद्घाटन केले होते. या नव्या मार्गामुळे कैलास मानसरोवरला जाणाऱ्या भारतीयांचा वेळ वाचणार आहे. मात्र, या मार्गाच्या उद्घाटनानंतर नेपाळने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. लिपुलेखसह भारताच्या सीमेवर सैन्यांची कुमक वाढवणार असल्याचे नेपाळने जाहीर केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here