सरासरी गुण देऊन पदवीच्या अंतिम वर्षाचा निकाल लावा; विद्यार्थी संघटनेची मागणी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या रखडलेल्या परीक्षांमुळे सरासरी गुण देऊन पदवीच्या अंतिम वर्षाचा निकाल लावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनेने केली आहे. कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. अनेक परीक्षाही रखडल्या आहेत. ‘कोरोनाचा कहर लवकर आटोक्यात येण्याची श्यक्यता नाही. यामुळे पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन निकाल देण्यात यावा’, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट युनियन अर्थात मासू या संघटनेच्या वतीने अॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी केली आहे. अॅड इंगळे यांनी याबाबतचं सविस्तर निवेदन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पाठवलं आहे. विद्यापीठाच्या परीक्षा एप्रिल मे महिन्यात होत असतात. मात्र, सध्या कोरोनाच्या संसर्ग असल्याने कोणत्याच परीक्षा झालेल्या नाहीत. कोरोना लवकर आटोक्यात येण्याची शक्यता नाही, त्यामुळे आता यूजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद कलम 5 नुसार तशी तरतूद आहे. याचा वापर करून निकाल देण्यात यावेत. तसं झाल्यास विद्यार्थ्यांचं एक वर्ष वाचण्याची शक्यता आहे, असं मासूचे अध्यक्ष अॅड सिद्धार्थ इंगळे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here