तुकाराम सुपेंच्या घरातून जप्त केलेले ६५ लाखांचे सोन्याचे दागिने परत करा; न्यायालयाचे आदेश

0

पुणे : टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरझडतीतून जप्त करण्यात आलेले ६५ लाख १३ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने सुपे व त्यांच्या कुटुंबीयांना परत करण्याचे आदेश पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.जे. डोलारे यांनी दिले.

सायबर पोलिसांनी टीईटी पेपरफुटी प्रकरणात तुकाराम नामदेव सुपे यांना १७ डिसेंबर २०२१ मध्ये अटक करण्यात आली आहे. यात शिक्षक पात्रता परीक्षेत परीक्षार्थीं कडून पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा आरोपही तुकाराम सुपे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सुपे यांना अटक केल्यानंतर तपासा दरम्यान सुपे यांच्या त्या घरामधून, तुकाराम सुपेंचा जावई, मुलगा, नातेवाईक व मित्र मंडळी यांच्या कडून सुपे यांनी पोलिस कोठडीत चौकशी दरम्यान दिलेल्या कबुली वरून वेगवेगळ्या ७ सुटकेस मध्ये भरुन ठेवलेले २ कोटी ३४ लाख रुपये रोख व ६५ लाख १३ हजार ८०० रूपयांचे सोन्याचे दागिने, पतसंस्था मधील मुदत ठेवीच्या पावत्या, पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या मिळकतींचे कागदपत्रे जप्त केले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी तुकाराम सुपे, सुखदेव ढेरे यांसह १५ जणांविरोधात ३,९९५ पानांचे दोषारोपपत्र पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेले आहे.

१९ डिसेंबर २०२१ रोजी तुकाराम सुपे यांच्या घरझडतीत एकूण ६५ लाख १३ हजार ८०० रूपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते. अॅड मिलिंद दत्तात्रय पवार व अॅड अक्षय शिंदे यांच्या वतीने कुटुंबियांनी पंचनाम्याने जप्त करण्यात आलेले दागिने तुकाराम सुपे यांना परत मिळावेत असा अर्ज फौजदारी दंडसंहिता कलम ४५१ अन्वये केला होता.

अॅड मिलिंद दत्तात्रय पवार व अॅड अक्षय शिंदे यांनी युक्तिवाद केला की, तुकाराम सुपे यांच्या घरझडतीतून जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने हे तुकाराम सुपे यांच्या कुटुंबीयांच्या वापरातील व मालकीचे आहेत. जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने हे तुकाराम सुपे यांच्या घरझडतीतून जप्त करण्यात आलेले असले तरी त्या सोन्याच्या दागिन्यांचा व आरोपी तुकाराम सुपे यांचा काही एक संबंध नाही. जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने हे तुकाराम सुपे यांच्या पत्नी, मुलगी, मुलगा, सुन व जावई यांचे आहेत. जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने हे जर पोलीस ठाण्यात पडून राहिले तर तुकाराम सुपे यांच्या कुटुंबीयांचे नुकसान होईल. खटल्याचा निकाल लागेपर्यंत जप्त सोन्याचे दागिने आहे त्या परिस्थितीत ठेवू व तसे बंधपत्र न्यायालयात देऊ. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून दागिने परत देण्याचा अर्ज मंजूर केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:24 24-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here