2024 ची तयारी सुरु, देशातील प्रमुख नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात : संजय राऊत

0

मुंबई : देशातील प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य शिवसेना (ठाकरे गट) खासदार
संजय राऊत यांनी केलं.

आम्ही हळूहळू 2024 ची तयारी सुरु केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंशी राष्ट्रीय राजकारणावर प्रदीर्घ चर्चा केल्याची माहिती देखील राऊतांनी दिली. ते आज सकाळी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

चर्चेत काही भूमिका ठरवल्या, काही दिवसांनी त्या समोर येतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये राष्ट्रीय राजकारणावर चर्चा झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. या चर्चेत काही भूमिका ठरवल्या आहेत. त्या चर्चा काही दिवसांनी समोर येतील असंही राऊतांनी सांगितले. येत्या काळात आम आदमी पार्टी आणि शिवसेना एकत्र येणार का? असाही राऊतांना प्रश्न विचारला, यावेळी राऊत म्हणाले की, यावर मी आताच बोलणार नाही. मात्र, देशातील प्रमुख नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं राऊतांनी सांगितलं.

केजरीवालांना दिल्लीत त्रास दिला जातोय

अरविंद केजरीवाल हे लढवय्ये नेते आहेत. त्यांनासुद्धा केंद्रीय सत्तेच्या माध्यमातून छळ दिला जात असल्याचे राऊत म्हणाले. दिल्लीच्या महापालिकेत आपचे बहुमत असतानाही तेथील निवडणुका होऊ दिल्या जात नसल्याचे राऊत म्हणाले. आम्ही सगळे संघर्ष करु पुढे जाऊ असेही राऊत यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सनसनाटी निर्माण करतायेत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करायची सवय लागली आहे. त्यांना स्टंट आणि सनसनाटी निर्माण करण्याचा छंद का लागला हे माहित नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी केलं. पूर्वीचे फडणवीस आणि आताचे फडणवीस यात फरक आहे. फडणवीस हे सध्या उपमुख्यमंत्री आहेत, किती काळ राहतील हे सांगता येत नाही. दिल्लीची मर्जी असा टोलाही राऊतांनी फडणवीसांना लगावला. ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली होती, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मला फोन करुन मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय. यावर संजय राऊतांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता, राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करायची सवय लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 25-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here