संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात कोंडअसुर्डे, खामशेत ग्रामपंचायतींची विभागीय स्तरावर निवड

0

रत्नागिरी : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२०-२०२१ आणि २०२१-२२ अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेतून जिल्हास्तरावर तीन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. त्यातील कोंडअसुर्डे (संगमेश्वर), खामशेत (गुहागर) या दोन्ही ग्रामपंचायतींची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गठीत केलेल्या सहा तपासणी पथकाकडून प्रत्येक जिल्हा परिषद गटात एका ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली. यामध्ये २०० पैकी १९८ गुण मिळवत संगमेश्वर तालुक्यातील कोंडअसुर्डे या ग्रामपंचायतीने प्रथम तर गुहागरमधील खामशेत ग्रामपंचायतीने १८९ गुण मिळवत द्वितीय तसेच चिपळूण तालुक्यातील मोरवणे ग्रामपंचायतीने १८६ गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला होता. या निकालाबरोबरच इतरही ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार देण्यात आले. यामध्ये सांडपाणी व्यवस्थापन करणार्‍या टेंभ्ये (रत्नागिरी) ग्रामपंचायतीला स्व. वसंतराव नाईक पुरस्कार, पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार अणसुरे ग्रामपंचायतीला (राजापूर), शौचालय व्यवस्थापनासाठी स्व. आबासाहेब खेडेकर पुरस्कार सांगवे ग्रामपंचायतीला (संगमेश्वर) जाहीर करण्यात आला होता. कोरोना परिस्थितीमुळे हा निकाल लांबणीवर पडला होता. यामुळे विभागीय स्तरावर तपासणी झाली नव्हती. या विभागीय स्पर्धेसाठी कोंडअसुर्डे व खामशेत ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. लवकरच या विभागीय स्पर्धेचा निकाल जाहीर होईल, असे सांगण्यात आले आहे.

असे होते गुणांकन

निकषानुसार झाली तपासणी पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन ५० गुण, शौचालय व्यवस्थापन ५० गुण, घनकचरा व्यवस्थापन २५ गुण, सांडपाणी व्यवस्थापन २५ गुण, घर, गाव, परिसराची स्वच्छता २० गुण, वैयक्तिक स्वच्छता १० गुण, लोकससहभागातून नाविन्यपूर्ण उपक्रम २० गुण अशा एकूण २०० गुणांसह तपासणी करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:41 25-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here