मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी राज्याचं शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार, मुख्यमंत्र्यांची सभागृहात ग्वाही

0

मुंबई : आज मराठी भाषा गौरव दिन या निमित्ताने विधानसभेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार यावर चर्चा झाली यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केला.

त्यानंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्याचं शिष्टमंडळ मोदींना भेटणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. मराठी राजभाषा गौरव दिनी मुख्यमंत्री शिंदेंनी ग्वाही दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. त्यांना त्याबाबत विनंती देखील करणार आहे. सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेईल आणि त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती करण्यात येणार आहे.”

छगन भुजबळ यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातचा मुद्दा उपस्थित केला होता. छगन भुजबळ म्हणाले की, “कुसुमाग्रजांची आज जयंती आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून गेल्या 14 वर्षापासून आपण प्रयत्न करत आहे. अभिजात दर्जा मिळवण्यासाठी गरजेचे असणारे चारही निकष आपली मराठी भाषा पूर्ण करते. असे असताना देखील अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. लवकरात लवकर हा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.”

महाराष्ट्रासह हा दिवस जगभरात उत्साहात साजरा केला जातो

आशिष शेलार म्हणाले की, “आज मराठी भाषा गौरव दिन आहे. महाराष्ट्रासह हा दिवस जगभरात उत्साहात साजरा केला जातो. दिल्लीत या संदर्भात गोष्टी मांडल्या आहेत. यासाठी सर्व पक्षांनी एप्रिल महिन्यात या संदर्भात दिल्लीला जाऊन भेट घेतली पाहिजे.”

राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. भारतामध्ये मराठी भाषिकांची संख्या ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे आपुलकी वाटणारी जिव्हाळ्याची मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा मराठी आहे. दरम्यान, जागतिक मराठी भाषा दिवसनिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाकरे गटाकडून जागर मराठी भाषेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्यावतीने कार्यक्रम पार पडणार आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:29 27-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here