जास्तीत जास्त शुद्ध मराठी लिहिण्या-बोलण्याचे चिपळूणमधील बालकुमारांना आवाहन

0

रत्नागिरी : मराठीची तोडफोड न करता जास्तीत जास्त शुद्ध मराठी बोलण्याचे आणि लिहिण्याचे आवाहन चिपळूणमधील बालकुमारांना करण्यात आले.

चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या संयुक्त विद्यमाने बालकुमारांमध्ये राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजावेत, या हेतूने झालेल्या मासिक मेळाव्याचे दुसरे सत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृतिदिन आणि मराठी राजभाषा दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आले. याच कार्यक्रमात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चिपळूणच्या अध्यक्ष डॉ. रेखा देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना शुद्धलेखनाची महती सांगितली. तसेच सावरकरांच्या ऊर्जस्वल कवितांची विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती सांगितली. या कवितांच्या आधाराने मुलांशी प्रश्नोत्तररूप संवाद करण्यात आला.

वाचनालयाच्या कलादालनात झालेल्या या मेळाव्यात स्वातंत्र्यवीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मेघ देवळेकर व ओजस कुंटे यांनी ”जयोsस्तुते” हे स्वतंत्रता स्तोत्र गायन केले. कल्याणी मंदार ओक हिने स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती प्रकट करणारे भाषण केले. सौ. मेघना चितळे यांनी ”बाल बलिदानी” या शीर्षकांतर्गत १९४२ च्या आंदोलनात निर्भयपणे तिरंगा फडकावून प्राणार्पण करणाऱ्या आसामच्या कनकलतेची कथा परिणामकारक शब्दांत सांगितली. सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीची, नवशब्द निर्मितीची माहिती देण्यात आली.

फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेषांना अनुसरून संत गाडगेबाबा, संत रामदासस्वामी, क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखले, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी महनीय व्यक्तींचे स्मरण या कार्यक्रमात आवर्जून करण्यात आले.

यावेळी मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने ‘मातृभाषा मराठी’ विषयीचे चिंतन करण्यात आले. मुलांनी मराठीची महती सांगणारी पाठ्यपुस्तकातील कविता तालासुरात म्हटली.

कार्यक्रमाचा समारोप स्वातंत्र्यवीर सावरकरकृत शिवरायांची आरती म्हणून मुलांनी केला. यावेळी कोमसापचे जिल्हा प्रतिनिधी राष्ट्रपाल सावंत आणि पालकही उपस्थित होते. पुढील मासिक मेळाव्यासाठी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एकत्र येण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:03 01-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here