खेड : तालुक्यातील रघुवीर घाटाच्या पायथ्याशी मात्र शिरगाव धरणामुळे अतिदुर्गम बनलेल्या शिरगाव भोसलेवाडी येथील डोंगर सध्या खचत आहे. त्यामुळे येथील सुमारे पन्नास घरांना धोका निर्माण झाला आहे. एक कि.मी.च्या परिसरात डोंगराला तीन ते चार फूट रुंदीच्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील अनेक विशाल वृक्षदेखील उन्मळून पडले असून, अनेक कोसळण्याच्या स्थितीत आहेत. याठिकाणी जमिनीचा एक मोठा भाग नजीकच्या भोसलेवाडीच्या दिशेने सरकू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, तहसीलदार यांना कळवून देखील अद्याप प्रशासनाकडून तलाठ्यांमार्फत जुजबी पंचनाम्याव्यतिरिक्त कोणतीही उपाययोजना झालेली नाही. या घटनेची तत्काळ दखल घेतली न गेल्यास मोठा अनर्थ होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. खेड तालुक्यातील शिरगाव हे गाव सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसले आहे. तिन्ही बाजूने सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगा व एक बाजूला डुबी नदीवरील पिंपळवाडी धरण असा रम्य परिसर आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या गावातील भोसलेवाडीतील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगत आहे. या भीतीचे प्रमुख कारण म्हणजे या वाडीच्या वरच्या बाजूला असळवल्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये डोंगरला मोठ्या प्रमाणात पडलेल्या भेगा आहेत. सुमारे १० एकर परिसरात डोंगराला भेगा गेल्या असून त्याच्या खालील भागात शेती, दहा गुरांचे गोठे, पन्नास घरे आहेत. डोंगराचा मोठा भूभाग खचून वस्ती व शेतीच्या दिशेने सरकू लागला असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जमीन खचल्याने या ठिकाणचे वृक्ष कोसळण्याच्या स्थितीत आहेत. मोठमोठे खडक जमिनीला भेगा पडल्याने निखळले असून तीव्र डोंगर उतारावर धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. शिरगाव भोसलेवाडीतील पन्नास घरातील रहिवासी भीतीच्या छायेत जगत असून त्यांनी स्थानिक तहसीलदार यांना याबाबत कळवले आहे. मात्र, तहसीलदारांनी या घटनेचा तलाठ्यामार्फत पंचनामा मागवून शासकीय सोपस्कार पार पडला आहे. त्यांनी घटनास्थळी भेटही दिली नाही किंवा अद्याप येथील ग्रामस्थांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शनदेखील केलेले नाही. रघुवीर घाटाच्या पायथ्याशी असलेली भोसलेवाडीच्या डोंगर परिसराची यंत्रणेने तत्काळ भूगर्भ शास्त्रज्ञांकडून पाहणी करून उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा या ठिकाणी माळीण दुर्घटनेसारखा मोठा अनर्थ ओढवण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
