रत्नागिरी : तालुक्यातील पूरस्थिती आता निवळली असली तरी झालेले नुकसान कोट्यवधीचे आहे. प्रशासनाने अद्यापही नुकसानीचे पंचनामे पूर्ण केलेले नाहीत. अनेक गावात मंडल अधिकारी पोहचलेले नाहीत. प्रशासनाची एक रुपयाची मदत तालुक्यातील पूरग्रस्तांना मिळालेली नसल्याचा हल्लाबोल म्हाडा अध्यक्ष आ.उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केला.प्रशासन देईल तेव्हा देईल पण पूरग्रस्तांना शिवसेनेच्यावतीने प्रथम मदत केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या कारभाराची माहिती आ. सामंत यांनी दूरध्वनीवरुन मुख्यमंत्र्यांना दिली. गावागावातून पंचनामे सुरु असून तालुक्यात ७६२ जणांचे सुमारे सव्वादोन कोटीचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. आ. सामंत यांनी रविवारी रत्नागिरी तालुक्यातील पूर आलेल्या गावांना दुसऱ्यांदा भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी येथील विदारक स्थिती समोर आली. याबाबत पत्रकारांशी बोलताना आ. सामंत प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेविषयी संतप्त झाले होते. चांदेराईमध्ये तीन-चार दिवस सातत्याने पाणी भरले होते. येथील लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र काही लोकांचे पंचनामेच करण्यात आलेले नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. मग केलेले पंचनामे नेमके तलाठी व सर्कल यांनी कोणत्या ठिकाणी बसून केले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. चांदेराई येथील रेशन दुकानामधून मोठी दुर्गंधी येत होती. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार केली. त्यावेळी तहसीलदारांशी मोबाईलवर संपर्क साधण्यात आला. त्यावेळी हा विषय पुरवठा विभागाशी अखत्यारीत येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. सामंत यांनी कजलेल्या धान्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असून, तसेच झाल्यास तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा दिला. त्यावेळी पुरवठा अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीलाच खड्डा खणून धान्याची विल्हेवाट लावण्याची सूचना केल्याचे आ. सामंत यांनी सांगितले. सर्वाधिक नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना पाच हजार रुपये व साहित्याचे वाटप केले जाणार आहे. तर पुरात थोडे नुकसान झालेल्या सुमारे साडेतिनशे कुटुंबियांना साहित्य दिले जाणार असल्याचे आ. सामंत यांनी सांगितले. शिवसेनेच्यावतीने मांडवी किनारी दहिहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. परंतु पूर परिस्थिती लक्षात घेता यंदा दहिहंडी उत्सव रद्द करण्यात आला असून, याठिकाणी होणारा पाच ते सहा लाखाचा वापर पूरग्रस्तांसाठी केला जाणार आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरीचा राजा गणेशोत्सव मंडळाच्यावतीने पन्नास हजार बॉटल पाणी कोल्हापूर येथे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही आ. सामंत यांनी सांगितले. शिवसेनेच्यावतीने मुंबईतूनही सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत केली जाणार असल्याचे स्पष्ट करताना, धान्य, पाण्याच्या बॉटल्स, साहित्य रवाना झाले आहे.
