…त्या निर्णयानंतर पंतप्रधान आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही : खासदार विनायक राऊत

0

मीरारोड : मुख्य निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांची नियुक्ती बेकायदा असल्याच्या आरोपांवर सर्वोच्च न्यायायच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झाले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गोयल यांना त्यांच्या पदावर राण्याचा नैतिक अधिकार नाही.

मात्र ते खुर्चीला चिटकून राहतील अशी टीका ठाकरे गटाचे नेते व शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मीरारोड येथील शिवगर्जना मेळाव्यात केली.

मीरा भाईंदर मधील ठाकरे समर्थक शिवसैनिकांचा मेळावा मीरारोड येथे शुक्रवारी रात्री आयोजित करण्यात आला होता . त्यावेळी विनायक राऊत यांनी भाजपा, मुख्यमंत्री शिंदे आदींवर टीका केली. दोन वर्ष महाविकास आघाडी सरकार मध्ये सत्ता भोगून मालमत्ता जमवली तेव्हा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली असे वाटले नाही. कोल्ह्या – लांडग्यांच्या गुहेत खासदार राजन विचारे बाळासाहेबांचा भगवा घेऊन ठाम उभे आहेत. ठाणे लोकसभा मतदार संघात स्वतःच्या मुलाला कशाला पाठवताय . हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः निवडणूक लढवावी. तुमचे डिपोझीट जनता जप्त केल्याशिवाय राहणार नाही. शिंदे गेल्या मुळे ठाण्यात शिवसेनेचे मोठ्या संख्येने पदाधिकारी वाढले आहेत.

धनुष्यबाणाचे पावित्र्य भ्रष्ट करण्याचे प्रयत्न भाजपाच्या माध्यमातून हे गद्दार करत असतील तर तो बाण तुमच्यावर उलटा चालल्याशिवाय राहणार नाही . खोके आणि बोक्यांच्या जीवावर उद्धव ठाकरे यांना एकटे पाडून शिवसेना संपवण्याचे कारस्थान केल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे . सत्तेचा दुरुपयोग करून देशातल्या ८ राज्यातील सरकारे भाजपाने पाडली. पण हा छत्रपतींचा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे तो तुम्हाला झुकणार नाही व नमणार नाही हे लक्षात ठेवावे असे राऊत म्हणाले.

खासदार राजन विचारे म्हणाले कि, ठाण्यात कट्टर शिवसैनिकांवर अगदी चेन स्नॅचिंग पासूनचे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांना विविध मार्गाने त्रास देण्याचे प्रकार सुरु आहेत . पण कट्टर निष्ठावंत शिवसैनिक डगमडलेला नाही . छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वजाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य उभारले. आज देखील सर्व जाती धर्माची लोकं आपल्या बरोबर आहेत. लोकांना कळतंय कि अन्याय झालाय व ते निवडणुकीची वाट पहात असून जनता गद्दारांना त्यांची जागा दाखवेल. गेल्या ५७ वर्षात शिवसैनिकांनी जीवाचे रान करून शिवसेना उभारली ती शिवसेना संपवण्याचे पाप गद्दारांनी केले आहे . सत्तेची दडपशाही आणि धनशक्ती चा कितीही वापर केला तरी जनता सहन करत नाही हे कसबा पोटनिवडणुकीत दाखवून दिले आहे.

माजी गटनेत्या नीलम ढवण यांनी आरोप केला कि, मीरा भाईंदर मधील बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांना आमिष दाखवले जात आहे, काहींना धमकावले जात आहेत तर काहींवर प्रशासनाला हाताशी धरून बळजबरी कारवाई करायला लावली जात आहे. यावेळी माजी नगरसेवक दिनेश नलावडे, अर्चना कदम, स्नेहा पांडे, जयंतीलाल पाटील, तारा घरत, शर्मिला बगाजी, लक्ष्मण जंगम, प्रियांका करंबळे, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला संघटक स्नेहल सावंत, उपजिल्हा प्रमुख धनेश पाटील, मच्छिमार नेते बर्नड डिमेलो, प्रवक्ते शैलेश पांडे, जयराम मेसे आदी सह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:19 04-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here