माचाळ येथे ११ मार्चला सापड लोककला आणि पर्यटन महोत्सव

0

रत्नागिरी : कोकणातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लांजा तालुक्यातील स्वर्गीय सुंदर माचाळ गावात पर्यटन बहरावे या हेतूने राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे येत्या शनिवारी (दि. ११ मार्च) सापड लोककला व पर्यटन महॊत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

माचाळ गावात स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनी रस्ता पोहोचला. त्यामुळे आता त्या गावाच्या विकासाची नवी दालने उघडणार आहेत. त्यातूनच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवे माचाळ हिल स्टेशन जगाच्या पर्यटन नकाशावर येणे आता दूर नाही, मात्र लोकल टू ग्लोबल माचाळच्या या विकासप्रकियेत १००-२०० वर्षांपूर्वीचे कोकणातील गाव कसे होते, याची ओळख एकविसाव्या शतकात करून देणारी माचाळची ग्रामीण संस्कृती जपायला हवी. माचाळच्या आल्हाददायक, थंड हवेच्या गिरीस्थानासोबतच ग्रामीण संस्कृती जोपासणाऱ्या लोकजीवनातही जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती आहे. हे लक्षात घेऊन माचाळमधील लोकसंस्कृती व तिथल्या दीर्घायुषी बनविणाऱ्या ग्रामीण शाश्वत जीवनशैलीची ओळख करून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून माचाळ ग्रामस्थांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

महोत्सवाचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी ४ वाजता होणार असून या महोत्सवात माचाळमधील निरोगी वातावरणात शतायुषी जीवनाचा आनंद घेणाऱ्या सखाराम भातडे आणि सौ. भातडे या दाम्पत्याचा सन्मान केला जाणार आहे. सायंकाळी ५ नंतर लोककला महोत्सवांतर्गत सापड लोककला, डफावरचे नृत्य, फुगडी नृत्य, जाखडी नृत्य, माचाळ विशेष नृत्य, आदिवासी व शेतकरी नृत्य या कार्यक्रमांचे सादरीकरण होणार असून यासोबतच माचाळ पर्यटनाची दिशा या विषयावर पर्यटन अभ्यासक लेखक धीरज वाटेकर, पत्रकार -लेखक विजय हटकर यांचे व्याख्यान होणार आहे. लांज्यातील नवोदित लेखक विजय हटकर यांचे माझे माचाळ -रत्नागिरी जिल्ह्यातील गिरीस्थान या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

महोत्सवाला सिंधुरत्न समृद्धी योजनेचे निमंत्रित सदस्य प्रमोद जठार, किरण सामंत, कोकणभूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, सुभाष लाड, सुनील कुरूप, विवेक सावंत, शिपोशी सरपंच हरेश जाधव, राजू भाटलेकर, पालू-माचाळच्या सरपंच सौ. वनिता नामे, उपसरपंच सागर गाडे, माचाळचे गावकर पांडुरंग पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमास उपस्थित राहून माचाळमधील लोककलांचा व पर्यटनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संघाध्यक्ष सुभाष लाड यांनी केले आहे. महोत्सव यशस्वी करण्यासाठी माचाळचे गावकर पांडुरग पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ मेहनत घेत आहेत. महेंद्र साळवी, विजय हटकर, गणेश चव्हाण, रमेश काटकर, प्रमोद पवार, दीपक नागवेकर, बंटी गाडे, प्रकाश हर्चेकर हे संघ सदस्य पूर्वतयारी करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:22 07-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here