रत्नागिरी : सांगली कोल्हापूर येथे भीषण परस्थिती निर्माण झाल्यानंतर सांगलीतील मौजे डिग्रज गावातील ३५० ग्रामस्थ पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. गावातील सर्वच ग्रामस्थांनी सुरक्षिततेसाठी यशवंतराव विद्यालयाचा आसरा घेतला होता. मात्र याठिकाणी मदत पोहचत नसल्याने ग्रामस्थांची घालमेल वाढली होती. याचवेळी पुरात अडकलेल्या एका ग्रामस्थाच्या नातेवाईकाने रत्नागिरीतील श्रीमती बावडेकर यांच्याशी एसएमएसद्वारे संपर्क साधला, त्यांनी मेसेज तसाच म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांना पाठवून मदतीची विनंती केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आ. सामंत यांनी तत्काळ प्रशासकीय यंत्रणा हलवून साडेतीनशे लोकांना संकटातून बाहेर काढत सुखरुप ठिकाणी पोहचविले. सांगली, कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीत अनेक मदतीचे हात झटत आहेत. परंतु अनाहतपणे गोंधळात अनेक ठिकाणी प्रशासनाचे लक्ष जात नाही. त्यामुळे जनतेचा जीव अगदी टांगणीला लागतो. रत्नागिरीतील एका मतदार महिलेने आपल्या सांगलीतील डिग्रज येथील ग्रामस्थांची स्थिती आ. सामंत यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी माणुसकीच्या नात्यातून तात्काळ या ग्रामस्थांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. मुंबईतील मिटींग सोडून त्यांनी तातडीने म्हाडाचे प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत खडतरे यांना सर्व विभागांशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आ. सामंत यांचे मंत्री असतानाचे तत्कालीन खासगी सचिव म्हणून काम केलेले गोपीचंद कदम हे सध्या सांगलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांच्याशी थेट संपर्क साधला. दुसरीकडे पोलीस अधिक्षक सोहेल शर्मा यांच्याशी आ.सामंत यांनी संपर्क केला. इतक्यातवर शांत न बसता काहीही करून या लोकांना बाहेर काढण्यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक यावळकर यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे सर्वांनीच धावपळ करुन लोकांना बाहेर काढले.
