जिल्ह्यातील साडेपाचशे उद्योग पुन्हा सुरु; 10 हजारांहून अधिक कामगार कार्यरत

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनामुळे केलेल्या टाळेबंदीतून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उद्योग सुरु करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील 937 पैकी 551 उद्योगांची धडधड सुरु आहे. यामध्ये 10 हजार 324 कामगार कार्यरत आहेत. सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आवश्यक ती काळजी कंपनीस्तरावरुन घेतली जात असल्याचे एमआयडीसी प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात सर्वाधिक उद्योग रत्नागिरी आणि लोट मध्ये आहेत. ज्या उद्योगांना अटींचे पालन करणे शक्य होते त्यांनी आरंभ केला. त्यात जिल्ह्यातील 551 उद्योगांचा समावेश आहे. या उद्योगांमध्ये बहूतांश कामगार वर्ग हा आजूबाजूच्या गावातून येणारा आहे. कामाच्या ठिकाणी येण्यासाठी एसटी सेवा हा पर्याय आहे. त्यामुळे कामगार वर्गाची उपलब्धता हा मोठा प्रश्न आहे. तरीही 551 उद्योगात 10 हजार 324 कामगार काम करत आहेत. त्यांची ने-आण करण्यासाठी बहूतांश कंपन्यांनी स्वतःच्या गाड्यांची व्यवस्था केली आहे. काही कामगार स्वतःच्या दुचाकीवरुन येत आहेत. ही धडधड सुरु झाल्यामुळे अनेक कामगारांच्या रोजगारा प्रश्न मार्गी लागला आहे; परंतु परजिल्ह्यातून येणाऱ्या कच्च्या मालावर आधारीत उद्योगांचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही कंपन्या, कारखाने मोठ्या प्रमाणात उत्पादन करु शकलेले नाहीत. काही ठिकाणी परराज्यातील कामगारांचा राबता होता. कोरोनाच्या भितीने काही कामगार वर्ग गावी निघून गेला आहे. त्याचा थोडासा परिणाम उद्योगांना जाणवणार असून कामगारांचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here