सदानंद कदम यांना अनिल परब यांनी फसवले : रामदास कदम

0

वेळणेश्वर : सदानंद कदम यांच्या कारवाईमध्ये माझा हातच काय तर डोकं किंवा पाय देखील नाही. सदानंद कदम यांना अनिल परब यांनी फसवले. ईडीने माझे ऐकले असते तर सर्वात आधी अनिल परब याला आत टाकायला सांगितले असते, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली. ते गुहागरमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री १९ तारखेला खेडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. त्या सभेच्या तयारीसाठी रामदास कदम गुहागरमध्ये आले होते. यावेळी सदानंद कदमांच्या अटकेबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले की, सदानंद कदम यांच्यावर झालेल्या कारवाईमध्ये माझा हातच काय, पाय, डोके देखील नाही. अख्या महाराष्ट्राला माहिती आहे रामदास कदम समोरुन अंगावर जातो. पाठीमागून खंजीर खुपसण्याचे काम मी कधीच केलेले नाही. मला जर तुरुंगात पाठवायचे असते आणि ईडीने माझे ऐकले असते तर सर्वात आधी अनिल परब याला आत टाकायला सांगितले असते. या अनिल परबने माझ्या मुलाला प्रचंड त्रास दिलाय. आमदार योगेश कदम याला राजकारणातून उध्वस्थ करण्याचा विडाच यांनी उचलला होता. उद्धवजी देखील परब यांच्याच खांद्यावर बंदुक ठेवून चाप ओढत होते. परबांनीच सदानंद कदमना फसवले आहे.

परब आणि कदम हे केबल व्यवसायात एकमेकांचे पार्टनर आहेत. सदानंद कदम यांची जागा अनिल परब यांनीच विकत घेतली होती. त्यानंतर अनिल परब यांनीच ती सदानंद कदमांच्या नावावर केली. ते स्वतः वकील असल्याने सगळी कागदपत्रे स्वतःच्या नावावर न ठेवता सदानंद कदम यांच्या नावे केली. मात्र परवानगीसाठी केलेला अर्ज अनिल परब यांच्याच नावाचा आहे. वीजेचे बीलही माझ्या माहितीप्रमाणे अनिल परब यांच्याच नावाने आहे. सदानंद कदम याला अनिल परब यांनी बळीचा बकरा बनविला, फसवले. त्यामुळे सदानंद कदम निश्चितपणे बाहेर पडतील. या प्रकरणात सखोल चौकशी अनिल परब यांचीच झाली पाहीजे, ही आज देखील माझी मागणी आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेतबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले की, उध्वजींनी रामदास कदमचा इतका धसका घेतला होता की त्यांना खेडच्या सभेसाठी अख्या महाराष्ट्रातून लोक बोलवावी लागली. आणि सांगायला लागले की, कोकण माझ्या पाठीशी आहे. 19 तारखेला सभा होईल ती कोकणातील जनतेची सभा होईल. कोकणवासीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यामागे खंबीरपणे उभे आहेत हे या सभेतून दिसेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 15-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here