उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का, निकटवर्तीय माजी मंत्री करणार शिंदे गटात प्रवेश

0

मुंबई : एका बाजूला राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामुळे राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना धक्का दिला जात आहे.

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई याचा शिवसेना-शिंदे गटात प्रवेश झाल्यानंतर आता आणखी एक नेता शिंदे गटात प्रवेश करणार आहे. ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी मंत्री दीपक सावंत हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. डॉ. दीपक सावंत हे राज्याचे माजी आरोग्य मंत्री आहेत. विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. दोन वेळेस ते मुंबई पदवीधर मतदारसंघातून ते निवडून गेले होते. दीपक सावंत हे 2006 आणि 2012 मध्ये शिवसेनेच्यावतीने विधान परिषदेवर निवडून गेले होते. मात्र, त्यानंतर तिसऱ्यांदा त्यांना तिकिट नाकारण्यात आले. भाजपा-शिवसेना सरकारच्या कार्यकाळात डॉ. दीपक सावंत हे आरोग्य मंत्री होते.

शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सोमवारी, उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे असणारे सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ‘बाळासाहेब माझे देव आहेत. एकनाथ शिंदे हिंदुत्वाच्या विचारांचा प्रसार करत आहेत. माझा त्याच्यावर विश्वास आहे. मी यापूर्वीही त्यांच्यासोबत काम केले आहे आणि भविष्यातही त्यांच्या पाठीशी उभे राहीन. एक सामाजिक कार्यकर्ता असल्याने मला शिंदे यांच्याकडून प्रेरणा मिळाली असल्याचे भूषण देसाई यांनी म्हटले होते.

भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर सुभाष देसाई यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम असल्याचे म्हटले. माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी म्हटले.

बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे, असेही सुभाष देसाई यांनी म्हटले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:42 15-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here