चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग पुढच्या आठवड्यात रशिया दौऱ्यावर जाणार आहेत.
यावेळी ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतील. एकीकडी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरु असताना ही भेट होणार आहे. जिनपिंग तीन दिवसीय रशिया दौऱ्यावर जाणार आहेत.
रशियन फेडरेशन क्रेमलिनने शुक्रवारी याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग 20 ते 22 मार्च यादरम्यान तीन दिवस रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. पुतिन यांनी शी जिनपिंग यांना रशियाला दौऱ्यावर आमंत्रण दिल्याची बातमी रशियाच्या टास वृत्तसंस्थेने 30 जानेवारी रोजी दिली होती.
चीनचे राष्ट्रपती रशिया-युक्रेन युद्ध संपवणार?
रशिया-युक्रेन युद्धात चीनची भूमिका आतापर्यंत वादापासून दूर राहण्याची होती. याशिवाय चीनने रशियावर कोणत्याही प्रकारे टीका करणं टाळलं, पण आता चीनने दोन्ही देशांनी शांततेने चर्चा करून वाद सोडवण्याचा प्रयत्न करण्याची, इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग रशिया दौऱ्यावर जाणार आहेत.
पुढच्या आठवड्यात जिनपिंग रशिया दौऱ्यावर
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग 20 ते 22 मार्च रोजी रशिया दौऱ्यावर आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाे यासंदर्भात माहिती दिली आहे. जिनपिंग आता रशिया आणि युक्रेनमधील युद्ध शांतता मार्गाने सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी ते पुतीन यांच्यासोबत चर्चा करणार असून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्सी यांच्यासोबतही चर्चा करणार आहेत.
जिनपिंग पुतिन आणि झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग पुढील आठवड्यात रशिया दौऱ्यावेळी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेऊन युद्धासंबंधित चर्चा करतील. तसेच जिनपिंग युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी व्हर्च्युअल बैठक करण्याचीही शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष दूर करण्यासाठी चीनचा सक्षम असेल अशी फारशी आशा नाही. चीनला यामध्ये किती यश मिळेल, हे आता पाहावं लागणार आहे.
