रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टाने (आयसीसी) मोठा झटका दिला आहे. युक्रेन युद्धा प्रकरणी आयसीसीच्या न्यायमुर्तींनी पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांनी याप्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘ही तर फक्त सुरुवात आहे.’
युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की म्हणाले की, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टाचा निर्णय हा रशियाने केलेल्या आक्रमणाविरोधात न्याय पुनर्संचयित करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.
हल्ला करण्यासाठी पुतीन यांचे सैन्य युक्रेनमध्ये पोहचले होते. तेव्हा युक्रेन लवकरच रशियापुढे गुडघे टेकणार असल्याचा अंदाज सर्वांनीच बांधला होता. पण आतापर्यंत असे काहीच झाले नाही. उलट युक्रेनने रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिले.
पुतिन यांचं पतन आणि रशियाची वाताहत होण्याची शक्यता अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रशियाचे माजी डिप्लोमेट बोरिस बोन्डारेव म्हणाले की, पुतिन यांचा या युद्धात पराभव झाला तर त्यांना आपलं पद सोडावे लागेल. गेल्यावर्षी युक्रेनवर रशियाने हल्ला केला होता. त्यानंतर बोन्डारेव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. बोन्डारेव हे जिनेव्हामध्ये रशियाचे आर्म्स कंट्रोल एक्सपर्ट म्हणून काम पाहत होते.
चीन करतेय मध्यस्थी –
युक्रेन आणि रशिया यांच्यातील वादामध्ये आता चीन मध्यस्थी करत आहे. नुकतेच चीनने ईरान आणि साऊदी अरब यांच्यातील वाद संपवला होता. आता चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली होती. गतवर्षीपासून चीन दोन्ही देशांचा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करत आहे. येणाऱ्या सोमवारी जिनपिंग दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते काय चर्चा करणार याकडे लक्ष लागले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपावे, याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.
रशिया आणि युक्रेनचे युद्ध हे अद्यापही सुरूच आहे. आतापर्यंत या युद्धात दोन्ही देशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तरी हे युद्ध अजूनही थांबलं नाही आहे. वर्षभरानंतरही या दोन देशांमध्ये युद्ध सुरु आहे. हे युद्ध संपावे, अशी प्रत्येक देशाची इच्छा आहे. दोन्ही देशाच्या युद्धाचा परिणाम जागातिक प्रत्येक देशावर झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 18-03-2023
