का गद्दारी केली त्याचे उत्तर देणार, का किती खोके घेतले याचे उत्तर देणार?; भास्कर जाधवांचे खोचक सवाल..

0

रत्नागिरी : लोकशाहीमध्ये कोणीही, कुठेही सभा घेऊ शकते. पण म्हणून प्रत्येक सभेला उत्तर दिले जात नाही. पण रामदास कदम एका पिसाने मोर होतात.

त्यांना कळत नाही. उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी सभा घेणे हा पोरकटपणा आहे. पण खरं तर एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून संयमाने वागायची अपेक्षा होती, असे मत उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. ही उत्तर सभा म्हणजे त्यांच्यासाठी राजकीय उत्तरकार्य ठरेल, अशी टीकाही त्यांनी केली.

रत्नागिरीतील विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना ठाकरे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावरही कडाडून टीका केली. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या म्हणींचाही वापर केला.

५ मार्चला उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेला उत्तर देण्यासाठी रविवार १९ मार्चला एकनाथ शिंदे यांची त्याच गोळीबार मैदानावर सभा होत आहे. निष्ठावंतांचा एल्गार असे त्याला नाव देण्यात आले आहे. या सभेबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, लोकशाहीत कोणतेही राजकीय नेते सभा घेतात. पण म्हणून त्याला उत्तर देणारी सभा घेतली जात नाही.

आता उत्तर देणार म्हणजे काय करणार? कशाचे उत्तर देणार? का गद्दारी केली त्याचे उत्तर देणार का? किती खोके घेतले याचे उत्तर देणार का? पक्ष सोडताना तुम्ही किती खोटे बोललात याचे उत्तर देणार का? असे अनेक प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:33 18-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here