बेदरकारपणे गाडी चालवून अपघात; चालकाला दंडाची शिक्षा

0

रत्नागिरी : बेदरकारपणे इन्होव्हा गाडी चालवून डंपरला धडक देत अपघात केल्याप्रकरणातील आरोपी चालकाला ग्राम न्यायालय पालीच्या पिठासीन अधिकारी पी. एस गोवेकर यांनी ४ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

अपघाताची ही घटना ७ जून २०१९ रोजी सायंकाळी ४ वा. पावस ते पूर्णगड जाणाऱ्या बायपास रस्त्यावरील पानगलेवाडी येथे घडली होती. संदीप रमेश गावडे ( ४०, रा . समर्थनगर जोगेश्वरी, पूर्वी मुंबई ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. ७ जून २०१९ रोजी संदीप गावडे त्याच्या ताब्यातील इन्होव्हा ( एमएच – ०२ – इएच -७५३ ) घेउन भरधाव वेगाने पावस ते रत्नागिरी असा जात होता. त्याच सुमारास ( एमएच – ०६ – एजी -६१८६ ) हा डंपर गोळप ते निरुळ असा जात असताना संदीपने त्या डंपरला धडक देत अपघात केला होता.

या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी संदीप गावडे विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात भा. दं. वि . कलम २७९ , ३३७, ३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते . या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक दिनकर सूर्य, पोलिस हवालदार देउस्कर, मुरकर यांनी काम पाहिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:45 18-03-2023