हिंदू नववर्ष स्वागतयात्रेच्या प्रचारासाठी रविवारी रत्नागिरीत दुचाकी, सायकल फेरी

0

रत्नागिरी : हिंदू नववर्ष स्वागतयात्रेच्या प्रचाराकरिता रविवारी (दि. १९ मार्च) सायंकाळी ५ वाजता दुचाकी व सायकल फेरी काढण्यात येणार आहे.

रत्नागिरीतील विवा एक्झिक्युटिव्ह येथे हिंदुत्ववादी संघटनांची सभा झाली.

मारुती मंदिर परिसर येथून नववर्ष स्वागतयात्रेत २२ चित्ररथ सहभागी होणार असून सुमारे तीन हजारांहून अधिक हिंदू बंधू-भगिनी यात्रेत पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेणार आहेत.

दरवर्षी ग्रामदैवत भैरी मंदिर ते समाजमंदिर पतितपावन मंदिरापर्यंत स्वागतयात्रा काढण्यात येते. शहराच्या वरील भागातून हजारो हिंदू या यात्रेत सहभागी होत असून २०१५ पासून मारुती मंदिर भागातून चित्ररथ येऊन ते जयस्तंभ येथे मुख्य स्वागतयात्रेत सामील होत असतात. हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे हे एकोणिसावे वर्ष आहे. प्रतिवर्षाप्रमाणे हिंदू परंपरेप्रमाणे विविध चित्ररथांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. स्वागत यात्रेसंदर्भातील माहितीपत्रके अद्वैत पेट्रोल पंप -माळनाका, गुरुकृपा मंगल कार्यालय – पऱ्याची आळी, पतितपावन मंदिर, गाडीतळ या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. हिंदू बांधवांचा सहभाग वाढावा, याकरिता प्रयत्न व्हावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या नागरिकांना स्वेच्छेने आर्थिक मदत करावयाची असल्यास केशव भट यांच्याकडे सुपूर्द करण्यात यावी. या यात्रेदरम्यान विविध शौर्य खेळदेखील असणार आहेत. विविध देखावे आहेत. यात्रेत जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीवेळी आनंद मराठे, संतोष पावरी, कोमल सिंह, कौस्तुभ सावंत, राकेश नलावडे, सचिन वहाळकर, केशव भट, रूपेश पेडणेकर आदींसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान या स्वागत यात्रेच्या प्रचारासाठी रविवारी पतिपावन मंदिर, शेरेनाका, काँग्रेस भुवन, साळवी स्टॉप, छत्रपती नगर, परत पतितपावन मंदिरापर्यंत सायकल आणि दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य सायकल फेरीत सहभागी होणार आहेत. तसेच स्वागतयात्रेमध्ये सायकलिस्ट क्लबतर्फे सायकलिंगचा प्रचार करणारा रथ ठेवण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:39 18-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here