रत्नागिरी : मराठी साहित्यामध्ये चैतन्य यावे, साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी आणि कोकणातून नवे साहित्यिक घडावे या उद्देशाने रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयातर्फे तिसर्या वर्षी अवघ्या साहित्य विश्वात औत्सुक्याचा विषय ठरलेली ‘साहित्यिक गुढी’ उभारण्यात येणार आहे.
कोकणच्या संस्कृतीचे खास वैशिष्ट्य असलेले संगमेश्वरी बोलीभाषेतील खणखणीत गार्हाणे यावेळी साहित्यातील अग्रणींना घालण्यात येणार आहे.
शालिवाहनाने शकांचा पराभव करण्यासाठी मातीच्या सहा हजार सैनिकांचे पुतळे तयार केले. त्यामध्ये प्राण फुंकून त्यांच्या साह्याने शकांचा पराभव केला. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस होता. शालिवाहनाने मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निर्जीव झालेल्या समाजामध्ये चैतन्य, स्वाभिमान आणि अस्मिता जागृत केली. शालिवाहनाच्या चमत्काराचा असा तर्कसुसंगत अर्थ काढता येतो. हाच अर्थ अभिप्रेत धरून ही साहित्यिक गुढी उभारली जाणार आहे. कोकणच्या साहित्य निर्मितीला आलेली मरगळ दूर होऊन सकस साहित्यनिर्मिती व्हावी, या उद्देशाने ही साहित्यिक गुढी उभारण्यात येणार आहे.
शालिवाहनाच्या पराक्रमाच्या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहनाच्या नावाने नवीन कालगणना चैत्र शुद्ध प्रतिप्रदेला ‘शालिवाहन शक’ अशी सुरू करण्यात आली. ज्याने विजय मिळवला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळवला ते ‘शक’ अशा दोघांचाही अंतर्भाव ‘शालिवाहन शक’ या संज्ञेमध्ये झाला आहे. यानिमित्त अवघ्या महाराष्ट्रात गुढी उभारली जाते. नव्याची सुरुवात आणि नव्याची निर्मिती, असा या सणाचा सोपा अर्थ आहे. त्याअनुषंगाने मराठी साहित्य विश्वात नव्याची निर्मिती व्हावी, वाचन आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, यासाठी नेहमीच कटीबद्ध असलेल्या जनसेवा ग्रंथालयातर्फे साहित्यिक गुढी उभारण्यात येणार आहे. साहित्य विश्वातील हा एकमेव आणि आगळा-वेगळा असा उपक्रम आहे.
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवारी, २१ मार्च रोजी सकाळी १० वाजता जनसेवा ग्रंथालयाच्या प्रांगणात ही साहित्यिक गुढी उभारण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुढीचे खास आकर्षण असलेल्या ‘साहित्य पताका’ लावण्यात येतील. ग्रंथालयाचे वाचक श्रीनिवास सरपोतदार यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विविध विषयांवर साहित्य पताका तयार केल्या जातात.
यावेळी पुस्तकांची माळ असलेली साहित्यिक गुढी मान्यवरांच्या हस्ते उभारण्यात येईल. त्यानंतर मान्यवर, नवोदित लेखक-कवी यांच्या हस्ते गुढीपूजन आणि ग्रंथपूजन होईल. गुढीपूजेनंतर कोकणातील साहित्य चळवळीला ऊर्जितावस्था लाभावी, नवनवे साहित्यिक निर्माण होऊन सकस साहित्य निर्मिती व्हावी, या उद्देशाने संगमेश्वरी बोलीभाषेतील लेखक अमोल पालये खणखणीत गार्हाणे घालतील. त्यानंतर मराठी साहित्याचा पाया रचणार्या संत साहित्याच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.
या कार्यक्रमाला नवोदित लेखक, वाचक, साहित्यिक, सभासद, विद्यार्थी, रत्नागिरीकर यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जनसेवा ग्रंथालयातर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18:09 20-03-2023
