स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची देवरुखमध्ये शाखा सुरू

0

रत्नागिरी
महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कारप्राप्त स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या एकूण 17 व्या शाखेचे देवरुखमध्ये उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी शनिवारी 10 ऑगस्ट रोजी केले. शिवाजी चौक येथे आपला बाजारशेजारी श्रीरंग शिर्के यांच्या इमारतीत तळमजल्याला शाखा सुरू झाली. पहिल्या दिवसापासूनच शाखेत सर्व व्यवहार संगणकीकृत सुरू झाल्याने ग्राहकांनी आनंद व्यक्त केला.
या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या देवरुख नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. मृणाल शेट्ये, व्यापारी संघटना अध्यक्ष गुरुप्रसाद तथा बाबा सावंत, जि. प. सदस्य रोहन बने, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, जि. प. माजी अध्यक्ष रश्मी कदम, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सचिन वहाळकर, संस्था उपाध्यक्ष माधव गोगटे, भाजप तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, लायन्स क्लबचे अध्यक्ष नितीन शेडगे, श्रद्धा देशपांडे, संतोष शेडगे, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, नगरसेवक, व्यापारी, वकील आणि सर्वसामान्य ग्राहक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या वेळी अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले की देवरुख आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाकरिता स्वामी स्वरूपानंद पतसंस्था विश्‍वासार्ह अर्थकारणातून नक्कीच योगदान देईल. आर्थिक क्षेत्रामध्ये भरपूर स्पर्धा असली तरी चांगल्या संधीचा उपयोग संस्था करेल. विश्‍वासार्ह सेवा देऊन रत्नागिरीवासीयांप्रमाणे देवरुखकरांच्या मनातही आम्ही आदराचे स्थान प्राप्त करू. स्वरूपानंद पतसंस्था आर्थिक शिस्त मानणारी असल्यामुळेच ग्राहकांचा भक्कम पाठिंबा मिळतो.
राज्य शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त स्वरूपानंद पतसंस्थेने ठेवी व कर्जाच्या अनेक आकर्षक योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. सोनेतारण कर्ज योजना अत्यंत लोकप्रिय आहे. फक्त 20 मिनीटामध्ये सोनेतारण कर्ज ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था आहे. संस्थेचे कामकाज दररोज सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे. संस्थेला ग्राहकसेवा देण्याची संधी द्यावी, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here