राज्यभरात मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत

0

मुंबई : आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. मराठी नववर्ष, गुढीपाडव्या निमित्ताने राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. मुंबईसह ठाणे, पुणे, कोल्हापूर,नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला.

राज्याच्या विविध भागात मिरवणूक, पारंपरिक वेशभूषा करत गुढीपाडवा साजरा करण्यात आला. काही ठिकाणी राजकीय नेते मंडळी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी शोभायात्रेत हजेरी लावली. मुंबई, ठाणे, डोंबिवली येथील शोभायात्रेत तरुणांसह आबालावृ्द्धांनी हजेरी लावली होती. मुंबईतील गिरगाव, लालबाग, दादर, चेंबूर, गोरेगाव आदी विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. या शोभायात्रेत मल्लखांब प्रदर्शन, पुणेरीसह विविध ढोल ताशा पथके, महिलांचे विशेष झांजपथक, विविध शोभायात्रा रथांचा सहभाग होता. गिरगावच्या फडके गणेश मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झालीये. 22 फुटांची गुढी उभारण्यात आली.

मुख्यमंत्रीदेखील सहभागी

ठाण्यातील कोपरी इथल्या श्री अंबे माँ चैत्र नवरात्र उत्सवाच्या देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. दरवर्षी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत देवीचा आगमन सोहळा पार पाडतो. मात्र यंदा मुख्यमंत्री पद तसेच अधिवेशन सुरू असल्याने कोपरीकरांना मुख्यमंत्री येणार की नाही याची चिंता होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मतदारसंघात साजरा होणाऱ्या या उत्सवात वेळात वेळ काढून हजर राहिले आणि त्यांनी केवळ हजेरी लावली नाही, तर सामान्य ठाणेकराप्रमाणे मिरवणुकीत सहभागी झाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या घरी गुढी उभारत कुटुंबीयांसह नवीन वर्षाचे स्वागत केले.

तुळजाभवानी मंदिराच्या कळसावर उभारली गुढी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी आजचा एक मुहूर्त असल्यानं आणि मराठी नवीन वर्षाचा पहिलान दिवस असल्यानं देवीची अलंकार पूजा करण्यात आली. देवीची पहाटे आरती करुन तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर गुलाबी रंगाच्या साडीची गुढी उभारून भगवा ध्वज लावण्यात आला.

लांजामध्ये मराठी नववर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत

रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजामध्ये गुढीपाडव्याच्या आदल्या रात्रीपासून देवाच्या नावाचा जयघोष करत, पारंपरिक गाणी म्हणत रात्रभर जागर करत मराठी नवीन वर्षाचे स्वागत केलं जातं. गावातील पाचाचा मांड या ठिकाणी सर्वधर्मीय आणि लहान थोर एकत्र येतात आणि पारंपरिक पद्धतीची गाणी म्हणत जागर करतात. याला स्थानिक भाषेत घोरीप असे म्हणतात. घोडा नाचवणे आणि हत्तीचे रूप हा यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.

अमरावतीत आगळी-वेगळी परंपरा

गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर अमरावतीच्या सावंगा विठोबा गावाची आगळी-वेगळी परंपरा आहे. या गावात कृष्णाची अवधूत महाराजांच्या मंदिरासमोर हजारो वर्षांपासून उभ्या असलेल्या 73 फुटांच्या दोन खांबावर झेंडा चढविला जातो. याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य म्हणजे 73 फूट उंच चडून झेंडा चढविणारा व्यक्ती आपले पाय या दोन्ही खांबांना लागणार नाही याची काळजी घेत झेंडा चढवला जातो. तो दोन्ही खांबांवरची जुनी खोळ काढून त्यावर नवीन खोळ चढवित झेंडा फडकवला जातो. विशेष म्हणजे हजारो किलोचा कापूर या ठिकाणी भाविक पेटवतात. ही कसरत बघण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांची गर्दी होते.

शेतकऱ्यांची काळी गुढी

एकीकडे राज्यात गुढीपाडव्यानिमित्त जल्लोषात मराठी नववर्षाचे स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र अहमदनगर जिल्ह्यातील तांदळी वडगाव येथे शेतकऱ्यांनी काळी गुढी उभारून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा, केंद्र सरकारने निर्यात धोरण बदलावे, शेतीमालाला हमीभाव द्यावा, 2022- 23 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज काळी गुढी उभारून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला. सोबतच राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकरी आत्महत्येबाबत केलेल्या विधानाचाही शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला.

तर, दुसरीकडे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कुटुंबासह गुढी उभारली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील शेतकरी आपल्या सातबारा वरील एमआयडीसीचा शेरा कमी व्हावा या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. अनेकांनी आश्वासन देऊन मागणी मान्य न झाल्याने या शेतकऱ्यांनी मंद्रूप ते मुंबई बैलगाडी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत काही दिवसातच उतारा कोरा करण्याचे आश्वासन दिल्याने या शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आज गुढीपाडवा असल्याने आंदोलन ठिकाणी या शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाड्यांवरती गुढी उभारून सण साजरा केला. घरात ज्या पद्धतीने गोडंधोड स्वयंपाक करून सण साजरे केले जातात तशाच पद्धतीने रस्त्यावर चूल मांडून खीर, पोळी, भाजी असा स्वयंपाक देखील या ठिकाणी करण्यात आला. आम्हाला दिवाळी देखील रस्त्यावर साजरी करावी लागली होती, आता पाडवा देखील रस्त्यावर साजरा करावा लागत आहे ही मोठी खंत असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18:00 22-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here