शिक्षक भरतीच्या पहिल्या निवड यादीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक परजिल्ह्यातील उमेदवार

0

रत्नागिरी : जुलै २०१७ मध्ये शिक्षक भरतीची घोषणा करून डिसेंबर २०१७ मध्ये भरतीची परीक्षा झाली होती. दीड-दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी पहिली निवड यादी जाहीर करण्यात आली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिकांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली असून तब्बल ९० टक्केपेक्षा जास्त परजिल्ह्यातील उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे येथील स्थानिकांची २०१० च्या भरतीसारखी निराशा झाली आहे. जिल्हास्तरावर होणारी भरती राज्यस्तरावरून होत असल्याने स्थानिक उमेदवारांना याचा फटका बसत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये नोकरीला लागायचे आणि बदली करून घ्यायची हे प्रमाण अलिकडे खूप वाढू लागले आहे. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होते व येथील शाळा ओस पडतात. शिक्षक बदल्यांचे प्रमाण मोठे असल्याने यावर पर्याय म्हणून स्थानिक शिक्षकांना प्राधान्य देण्याची भूमिका रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने घेतली होती. स्थानिकांना प्राधान्य देण्याबाबतचे ठरावही जि. प. ने केले होते. परंतु या ठरावांना केराची टोपली दाखवत पुन्हा एकदा राज्य स्तरावरून भरती करण्यात आली. त्यामुळे या भरतीतून स्थानिक डीएइ, बीएड् धारक हद्दपार झाले आहेत. सन २०१० च्या भरतीत रत्नागिरी जिल्ह्यात १ हजार १५७ जागांवर ३७ स्थानिकांची डीएड, बीएड् धारकांनी आंदोलने केली. लोकप्रतिनिधीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. परंतु शासन स्तरावर पाठपुरावा न झाल्याने हीच स्थिती २०१९ च्या भरतीत कायम राहिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १ ली ते ५ वी साठी ४५४ जागा तर ६ वी ते ८ वी साठी २०५ जागांवर भरती करण्यात येत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ वी ते ८ वी गणित, विज्ञानसाठी २७८ शिक्षक भरण्यात येणार होते. यापैकी १०२ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यात स्थानिकांचे प्रमाण नगण्य असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ९० टक्केपेक्षा जास्त परजिल्ह्यातील उमेदवार लवकरच रुजू होणार आहेत. मुलाखतीशिवाय भरतीसाठी जाहिरातीनुसार ५ हजार ८२२ पदांची निवड यादी पवित्र पोर्टलवर शुक्रवारी जाहीर करण्यात आली.१३ ते २१ ऑगस्ट या काळात कागदपत्रे पडताळणी होणार आहे. राज्यात १२ हजार १४० पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी मुलाखतीशिवाय ९ हजार १२८ पदे भरली जात असून यापैकी ९ हजार ८० पदे मुलाखती शिवाय भरतीसाठी उपलब्ध होती. त्यापैकी ५ हजार ८२२ पदासाठी निवड यादी जाहीर करण्यात आली त्यापैकी ३ हजार २५८ पदे रिक्त राहिली आहेत. ५ हजार ८२२ सूची जाहीर करण्यात आली आहे. इयत्ता सहावी ते आठवी वा गटात मुख्यत्वे इंग्रजी गणित व विज्ञान विषयाकरिता अर्हता प्राप्त उमेदवार उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे २ हजार ३९२ पदे रिक्त राहिली आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमधील २ हजार ३११, उर्दू ६९७, इंग्रजी २३७ पदावर पात्र उमेदवार मिळालेले नाहीत. हिंदी २७, कन्नड १२ आणि पालिकेच्या हिंदी माध्यमाची १३ अशीही पदे या यादीत रिक्त राहिली आहेत. यामध्ये आरक्षण निहाय अनुसूचित जाती प्रवर्गातील ३६९, इतर मागासवर्गीय ३०१, एसईबीसी २३२, इडब्लूएस १६१, खुल्या गटातील ११६, भटक्या जमाती ब, क, व ड प्रवर्गातील २२७, विमुक्त जाती प्रवर्ग ८१ आणि विशेष मागास प्रवगार्तील ६५ पदावर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे मेरीट जास्त लागल्याने अनेकांची निराशा झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here