मुंबई : मागील काही आठवड्यापासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यात पडणार्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत झाले असून येथील अनेक रहिवाशांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्व पुरग्रस्तांच्या नुकसानीचा आढावा घेऊन शासनाकडून योग्य ते सहाय्य करण्यात येईल, असे रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी सांगतिले. रत्नागिरी जिल्ह्यात पडणार्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पुर परिस्थिती निर्माण झाली. तालुक्यातील अनेक घरांचे, दुकानांचे, रस्ते, साकव, पुल, गुरे, शेतीचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मुसळधार पडणार्या पावसामुळे घडणार्या विविध घटनांची माहिती घेत रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री सातत्याने विविध खात्याच्या प्रशासकीय अधिकार्यांबरोबर स्थानिक पदाधिकारी यांच्या संपर्कात तर होतेच त्याच बरोबर त्यांना वेळोवेळी योग्य त्या सुचनाही देत होते. जिल्ह्यातील पावसामुळे रत्नागिरी, चिपळुण, संगमेश्वर, खेड, लांझा, राजापुर आदी तालुक्याच्या ठिकाणी झालेल्या नुकसानाची माहितीही ते तालुक्याचे प्रांत तसेच तहसिलदार यांच्याकडून सातत्याने घेत होते. वेळप्रसंगी मुंबईहून आवश्यक ती मदत पाठविण्याची तयारीही त्यांनी जिल्हाधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे दर्शवली. पुरग्रस्तांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्याच्या तसेच येथील रुग्णांना वेळीच उपचार मिळावे यासाठी, जिल्हाधिकारी तसेच आरोग्य अधिकारी यांच्या समवेत चर्चा करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचा परिपुर्ण आढावा घेण्यात संबंधित अधिकार्यांसमवेत १५ ऑगस्ट रोजी बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत आढावा घेतल्यानंतरच विविध तालुक्यांचे विस्कळीत झालेले जनजिवन पुर्ववत करण्यासाठी कृती आराखडा तयार करुन त्या त्या तालुक्यातील नुकसानग्रस्तांना शासनातर्ङ्गे मदत करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून वेळप्रसंगी मुख्यमंत्री यांच्या समवेतही चर्चा करण्यात येईल, असे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी कळविले आहे.
