आनंदाचा शिधा गुढीपाडव्यालाही पोहचलाच नाही

0

रत्नागिरी : शिंदे-फडणवीस सरकारने नागरिकांना खूष करण्यासाठी दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यभर शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती. मात्र दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवाही आनंदाच्या शिध्याने गोड झाला नाही.

दीपावलीप्रमाणेच मराठी नववर्षानिमित्त गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने आनंदाचा शिधा पुन्हा वाटप करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याबाबतची घोषणा महिनाभर आधीच करण्यात आली. यात शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल दिले जाते. दिवाळीच्यावेळी सण साजरा झाल्यानंतर अनेक दिवस त्याचे वाटप सुरु होते. यावेळी मागील अनुभव लक्षात घेऊन शासन गुढीपाडव्याचा सण आनंदाच्या शिध्याने गोड करेल असे नागरिकांना वाटत होते. परंतु यावेळीही निराशाच पदरी पडली.

आनंदाच्या शिध्याचा जिल्ह्यात 2 लाख 62 हजार 172 शिधापत्रिकेवरील 9 लाख 90 हजार 672 लाभार्थ्यांना आणि अंत्योदय गटातील 37 हजार 246 शिधा पत्रिकेवरील एक लाख 36 हजार 107 लाभार्थी असे 11 लाख 26 हजार 780 लाभार्थ्यांना लाभ मिळणार होता. जिल्हा पुरवठा विभागाने घोषणा झाल्यानंतर चारही वस्तूंची मागणी वेळेत नोंदवली होती. परंतु गुढीपाडवा होऊन गेला तरी आनंदाचा शिधा रत्नागिरीत पोहचलाच नाही. त्यामुळे वितरण करण्याचा प्रश्नच दुकानदारांना आला नाही. रास्तदर धान्य दुकानदारांनी व मालवाहतूकदारांनी शिधा आल्यावर योग्य पध्दतीने वाटप व्हावे यासाठी नियोजनही करुन ठेवले होते. मात्र शिधाच न आल्याने नियोजन कामी आले नाही. दिवाळीच्या वेळेलाही काही वस्तु आधी आल्या तर तेल व साखर नंतर उपलब्ध करुन देण्यात आली.

आनंदाच्या शिध्याबाबत माहिती देताना जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी सांगितले की, आनंदाच्या शिध्याचा लाभ राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय गटातील शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे. जिल्ह्यात 2 लाख 62 हजार 418 संचांची मागणी नोंदवण्यात आली आहे. मात्र अद्याप हा शिधा जिल्ह्यात पोहचलेला नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 28-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here