संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार : सुषमा अंधारे

0

परळी : ठाकरे समर्थक शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली आहे.

मला कोणतंही बाईपणाचं किंवा व्हिक्टिम कार्ड खेळायचं नाहीये. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतोय, यासाठी पुढे येऊन काहीतरी केलं पाहिजे. अशा विकृतींचा धडा शिकवला पाहिजे, या भूमिकेतून मी आता संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहे, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं. शिरसाट यांनी सुषमा अंधारेंवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यभरात खळबळ माजली आहे. महाविकास आघाडीतील विविध पक्षांच्या महिला नेत्या शिरसाट यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. यापुढे कोणत्याही लोकप्रतिनिधीने महिलांवर भाष्य करताना शंभर वेळा विचार करावा, यासाठी मी शिरसाट यांच्याविरोधात दावा ठोकणार आहे, असं वक्तव्य अंधारे यांनी केलं. परळीत आज त्यांनी या विषयावरून पत्रकार परिषद घेतली.

‘फडणवीस, शिंदे पाठीशी घालतायत’

आपली खुर्ची टिकवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अशा लोकांना, अशा विकृतींना पाठिशी घालत आहेत. अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील हे महिलांवर बोलतात हेच त्यांचं क्वालिफिकेशन आहे का? म्हणून तुम्ही आमदार आणि मंत्री म्हणून त्यांना सोबत ठेवतात. शिरसाटांनी अत्यंत घाणेरडी भाषा वापरली. कोण आहे पाटील नावाची व्यक्ती? असा वक्तव्यामुळे संजय शिरसाट यांच्या
गुन्हा दाखल होणार नसेल तर फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही विकृतींना पाठिशी घालत आहेत. जाणीवपूर्वक आपली खुर्ची टिकवण्यासाठी करत आहेत, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय.

हे कुभांड कशासाठी?

सुषमा अंधारे यांच्याविरोधात हे कुभांड रचलं जातंय.. ते कशासाठी, याचं कारण त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्या म्हणाल्या, ‘ सुषमा अंधारेच्या पाठीवर ईडी, सीबीआय, करप्शनचं बॅगेज नाही. त्यामुळे बाईपणावर हल्ले करणं जास्त सोपं आहे. मी आधीही सांगतेय, मी कुठलंही बाईपणाचं व्हिक्टिम कार्ड खेळणार नाही. मी कधी कॅमेऱ्याचा सोसही केला नाही. तीन दिवसांपासून मी माध्यमांशी बोलायचं टाळत होते. म्हातारी मेल्याचं दुःख नसतं पण काळ सोकावतो म्हणून मी तक्रार केली. अशा विकृत प्रवृत्ती वेळीच ठेचायला हव्यात.

शिरसाटांनी सभा घेऊन यावर बोलायला हवं. विरोधक म्हणून मी बोलेनही. पण असे सवंग प्रयत्न थांबले पाहिजे. या सगळ्या स्थितीत महाविकास आघाडीची वज्रमूठ बांधली जात आहे. किमान समान मुद्द्यावर एकत्रितपणे काम करायचे ठरवत आहोत. त्यामुळे अशा भ्याड प्रयत्नांनी आम्ही माघार घेणार नाहीत, असा इशारा अंधारे यांनी दिला.

‘माझी लढाई लढण्यासाठी मी खंबीर’

संभाजीनगरमध्ये माझ्या संदर्भाने अंबादास दानवे यांनी जोडो मारो आंदोलन बऱ्याच गोष्टी केल्या. तमाम शिवसैनिकांचे आभार मानते. माझी लढाई लढण्यासाठी मी फार खंबीर आहे. ती लढाई लढण्यासाठी मला फार वेगळ्या गोष्टी कराव्या लागणार नाहीत. भविष्यात कुठल्याही महिलेवर कोणत्याही लोकप्रतिनिधीने बोलताना शंभर वेळा विचार केला पाहिजे. ओरिजनल व्हिडिओला मॉर्फ म्हणून कांगावा करत असाल तर ओरिजनल पब्लिक डोमेनमध्ये शिरसाट बोलले असताना त्यावर काय भूमिका असेल, असा सवाल सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांना केलाय.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:32 28-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here