रत्नागिरी जिल्ह्यातील ८४६ पैकी फक्त ७ ग्रामपंचायतीत घंटागाडी

0

रत्नागिरी : ग्रामीण भागात घराघरातून कचरा उचलण्यासाठी घंटागाडी सुरू करण्याची संकल्पना पुढे आली होती. नागरी वस्तीमधील कचराकुंड्यांना हद्दपार करणे हा प्रमुख उद्देश आहे; मात्र जिल्ह्यातील ८४६ पैकी फक्त ७ ग्रामपंचायतीत घंटागाडी आहे. प्रशासनाने २२ ग्रामपंचायतींसाठीचा प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे सादर केला आहे.

जिल्ह्यात मोजक्याच ग्रामपंचायतीत घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा उचलला जातो. १४ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागातील घंटागाड्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. नागरीकरणामुळे उपलब्ध सोयीसुविधांवर ताण येतो. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, शौचालय, दिवाबत्ती अशा सुविधा अपुऱ्या पडत आहेत. प्रशासनाला सोयीसुविधा पुरवताना कसरत करावी लागते. गावांमध्ये खऱ्या अर्थाने कचऱ्याची मोठी समस्या आहे. दररोज निर्माण होणारा कचरा कसा उचलायचा कसा, हा प्रश्न आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता इंधनाच्यादृष्टीने ग्रामपंचायतीला अडचणीचे ठरते. ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात उत्पन्नाचे साधन उपलब्ध नसल्याने होणारा अतिरिक्त खर्च करणे शक्य होते नाही. तरीही पंधराव्या वित्त आयोगातून कचरा उचलण्यासाठी तरतूद करून ठेवण्यात आली आहे. प्रत्येक घरात जाऊन कचरा गोळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाऊ शकते. कचऱ्यासाठी घंटागाडी ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी ग्रामपंचायतींकडून चांगला प्रतिसाद मिळत नाही.

जिल्ह्यात असलेल्या ८४६ ग्रामपंचायतीपैकी ७ ग्रामपंचायतीत घंटागाडीची व्यवस्था आहे तर ८३९ ग्रामपंचायतींकडे घंटागाडीची व्यवस्था नाही. घंटागाडीसाठी तरतूद असली तरीही देखभाल व इतर खर्चाचा प्रश्नच आहे. जिल्हा परिषदेने ५ हजार लोकसंख्येपेक्षा मोठी गावे आहेत, त्या ग्रामपंचायतीत घंटागाडी घेण्याबाबत सूचना केल्या आहेत.

पहिल्या टप्प्यात २२ ग्रामपंचायतींमध्ये ही घंटागाडी घेण्यात येणार आहे. निधीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे मागणी करण्यात आली आहे. गावागावांमध्ये कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी घ्याव्यात, असे आवाहन केले आहे. त्याला हळूहळू प्रतिसाद मिळत आहे. घंटागाड्या मोजक्याच ग्रामपंचायतीत आहेत. त्यातील काहींनी कर्ज घेऊन खरेदी केलेल्या आहेत अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:04 30-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here