रत्नागिरी-नागपूर महामार्गावरून प्रवास महागला, उद्यापासून पथकरात होणार वाढ

0

सांगली : रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या पथकरामध्ये शनिवारपासून (दि. १) वाढ होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तसे प्रकटन प्रसिद्ध केले आहे. अवघ्या सात महिन्यांतच या मार्गावर पथकरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.

१६ ऑगस्ट २०२२ रोजी पथकर (टोल) वसुली सुरू झाली होती. त्याला वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच वाढ जाहीर झाली आहे. अर्थात, राज्यभरातील महामार्गावर १ एप्रिलपासून पथकरवाढ होणार असल्याने रत्नागिरी-नागपूर महामार्गालाही लागू झाली आहे. सांगली जिल्ह्यात बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे टोलनाका आहे. तेथे किमान १० ते कमाल १ हजार ५९५ रुपये अशी दरवाढ आहे. ती शनिवारी (दि. १) सकाळी आठपासून अंमलात येईल. मासिक पासचे शुल्कही वाढवले आहे. परिसरातील गावांतील बिगरव्यावसायिक वाहनांचा वार्षिक पास ३१५ रुपयांवरून ३३० रुपये केला आहे.

मोटार, जीप व हलक्या वाहनांना दुहेरी प्रवासासाठी १०० ऐवजी आता ११० मोजावे लागतील. लहान मालवाहू टेम्पो, मिनीबस यांना १६५ वरून १८० रुपये दुहेरी पथकर असेल. दोन ॲक्सलच्या ट्रक व बसचा पथकर ३४० वरून २८० झाला आहे. तीन ॲक्सलच्या व्यावसायिक वाहनांसाठी ३७० ऐवजी ४१५ पथकर असेल. चार ते सहा ॲक्सलच्या अवजड वाहनांसाठी ५३५ वरुन ५९५ रुपये द्यावे लागणार आहेत. सातपेक्षा जास्त ॲक्सलच्या अवजड वाहनांसाठी ६५० ऐवजी ७२५ रुपये द्यावे लागणार आहेत.

पथकर वाढ अशी (एकेरी प्रवासासाठी)

वाहन – जुना पथकर – नवा पथकर – जुना मासिक पास – नवा मासिक पास
जीप, मोटार, व्हॅन – ६५ – ७५ – २२४० – २४८५
मिनी बस – ११० – १२० – ३६१५ – ४०१५
ट्रक, बस – २२५ – २५० – ७५७५ – ८४१०
व्यावसायिक वाहने – २५० – २७५ – ८२६५ – ९१७५
अवजड वाहने – ३५५ – ३९५ – ११८८० – १३१९०
सातपेक्षा जास्त ॲक्सलची अवजड वाहने – ४३५ – ४८० – १४४६५ – १६०६०

तीनही पथकर नाक्यांवर दरवाढ

सांगली जिल्ह्याच्या पुढे अनकढाळ आणि इचगाव या नाक्यांवरही पथकरवाढ झाली आहे. त्यामुळे मिरज ते सोलापूर या अंतरात तीन ठिकाणी जादा पथकर द्यावा लागेल. छोट्या वाहनांना किमान ३० रुपये आणि अवजड वाहनांना १३५ रुपये अतिरिक्त मोजावे लागतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 31-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here