संजय राऊत धमकी प्रकरणी सरकारने योग्य कारवाई करावी : अजित पवार

0

पुणे : खासदार संजय राऊत यांना आलेल्या धमकीप्रकरणी पोलिस विभाग, सरकारने योग्य ती नोंद घेत पुढील कार्यवाही करावी. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदींना धमक्या आल्या आहेत.

कधी त्यात तथ्य असते, कधी माथेफिरु लोकं अशा पद्धतीचे फोन करतात. तपास यंत्रणांनी त्याचा तपास करावा, त्यामध्ये कोणी जाणीवपूर्वक काही करत असेल तर ते चुकीचे आहे. राज्यात वारंवार घडणाऱ्या या घटना गृहखात्याचे अपयश आहे का, या प्रश्नावर ते शोधण्याचे काम मिडियाने करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

बारामती येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, सरकारला जनतेची पण काळजी घ्यावी लागते, पण जनतेचे प्रतिनिधी असलेल्या खासदाराबाबत अशा घटना घडत असतील, तर लोकसभा, राज्यसभा त्याची दखल घेते. मी यासंबंधी माहिती घेत आवश्यक ते सहकार्य करेन, असेही पवार म्हणाले.

संभाजीनगरला झालेला प्रकार हा एका समाजातील अंतर्गत प्रश्न आहे. दोन वेगवेगळ्या समाजात तेथे दंगल झालेली नाही. परिस्थिती आटोक्यात आणण्याचे काम पोलिस यंत्रणेने केले आहे. आम्ही पण ते करत आहोत. या विषयाला कारण नसताना मिडियाने वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करू नये. ते आपापसातले भांडण होते. परंतु छत्रपती संभाजीनगर मुळे त्याला वेगळी प्रसिद्धी मिळाली. तेथे रविवारी आयोजित महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. सभा व्यवस्थित पार पडेल, असे अजित पवार म्हणाले.

…आपल्यामध्ये जरा माणूसकी राहू द्या

दिवंगत खासदार गिरीष बापट यांच्या निधनानंतर पुण्यात लागलीच काहींनी भावी खासदाराचे फलक झळकवल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, मी काल बापट कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. आपल्यात १३-१४ दिवस दुखवटा पाळला जातो. अजून त्यांच्या अस्थींचे विसर्जन झाले नाही. आपल्यामध्ये जरा माणूसकी राहू द्या, एवढे गुडघ्याला बाशिंग बांधायचे काही कारण नाही. सत्ताधारी व विरोधकांनीही यात तारतम्य बाळगले पाहिजे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुनावले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:51 01-04-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here