रत्नागिरी : सागरी महामार्गाच्या कामाबाबतचा निर्णय घेण्यास सध्या थांबलो आहे. आधी मुंबई – गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वास नेणे अत्यावश्यक आहे. रत्नागिरी ते मुंबई वॉटर टॅक्सी सुरू करता आली तर अतिशय कमी वेळेत प्रवास होऊ शकतो. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी बोलणे झाले आहे. तसेच पाण्यावर उतरणारे प्रवासी विमानतळ करण्यासही काही हरकत नसल्याचे केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ना. गडकरी हे गुरुवारी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले असता एमआयडीसी गेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन आदी उपस्थित होते. सागरी महामार्गाबाबत इतक्यात निर्णय घेणार नाही. आधी मुंबई – गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वास जाणे फार गरजेचे आहे. नागरिकांना याचा त्रास होतोय. रत्नागिरी-मुंबई वॉटर टॅक्सी सुरू करण्यास हरकत नाही, याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो. यासाठी ना. उदय सामंत यांच्याशी चर्चा केली आहे. ते यात लक्ष घालतील, असेही ना. गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
रत्नागिरीत नेव्हीचे विमानतळ असल्याने पाण्यावर तरंगणारे विमानतळ करण्यास हरकत नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पर्यटन आणि जिल्ह्याच्या विकासात्मक बाबींवर सकारात्मक परिणाम होईल, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:38 01-04-2023
