मजुरांनी दिलेल्या ‘उद्धव ठाकरे जिंदाबाद’च्या घोषणा कदाचित योगींना आवडल्या नसलीत : संजय राऊत

मुंबई : ‘स्थलांतरित मजुरांची महाराष्ट्राने दीड महिना चांगली व्यवस्था केली होती. मजूर रेल्वेने घरी जाताना महाराष्ट्र सरकार जिंदाबाद किंवा उद्धव ठाकरे जिंदाबाद, अशा घोषणा करत गेले. त्याचे व्हिडीओक्लिप्स आम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवले. योगींना ते कदाचित आवडलं नसेल’, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ‘उत्तर प्रदेशातील मजुरांना काम द्यायचं असल्यास आमची परवानगी घ्यावी लागेल’, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आम्हालाही बाहेरच्या राज्यातील मजुरांसाठी नियम बनवावे लागतील. सगळ्यांना पारखून घ्यावं लागेल’, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं. ‘योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राला दोष देण्यापेक्षा त्यांच्या राज्यातील स्थलांतरित मजूर आपापल्या घरी सुखरुप पोहोचले का? त्यांना अन्नपाणी मिळतंय का? याकडे लक्ष्य द्यायला हवं. कारण देशभरातून गेलेले हिंदी भाषिक मजूर नरक यातना भोगत होते, त्यांना आपल्या गावात आणि घरात जाण्यापासून रोखण्यात आलं, हे आख्या देशाने आणि जगाने पाहिलं’, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. ‘अनेक राज्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. कारण त्यांच्या भागातील कामगारांची काळजी महाराष्ट्र सरकारने उत्तम पद्धतीने घेतली. याचं त्यांनी कौतुक केलं. उदिसाचे नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सर्वांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आणि सरकारी यंत्रणेचे आभार मानले’, असे संजय राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here