नवी दिल्ली : सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधूया भारताच्या स्टार शटलर पुढील आठवड्यापासून स्वित्झर्लंडमधील बासेल येथे सुरू होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत आमने-सामने उभ्या ठाकू शकतात. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेच्या ड्रॉमध्ये सायना व सिंधू यांना एकाच हाफमध्ये स्थान मिळाले आहे. सायना व सिंधूने स्पर्धेची सुरुवातीची फेरी पार करण्यास यश मिळविले तर सेमीफायनलमध्ये या दोहोंत गाठ पडू शकते. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिंधूने दोन रौप्यपदके पटकावली आहेत. दरम्यान, पाचव्या मानांकित सिंधूला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे. यामुळे ती आपल्या मोहिमेस चिनी तैपेईच्या पाईयू पो अथवा बल्गेरियाच्या लिंडा जेचिरी यांच्याविरुद्ध करण्याची शक्यता आहे. आठव्या मानांकित सायनालाही बाय मिळाला असल्याने तिची दसऱ्या फेरीत स्वित्झर्लंडच्या सबरिना जाकेट आणि नेदरलँडच्या सोराया डि विश्च इजबर्गन यांच्यातील विजेत्याशी पडणार आहे. सायनाने दुसरी फेरी जिंकली तर तिची तिसऱ्या फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टविरुद्ध आणि सिंधूची गाठ अमेरिकेच्या बेवेन झांगविरुद्ध पडणार आहे. बीडब्ल्यूएफने दुसऱ्यांदा या स्पर्धेचा ड्रॉ काढला. मात्र, तो का काढला? याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. बीडब्ल्यूएफने नजरचुकीने सुरुवातीला काढलेल्या ड्रॉमध्ये मॉरिशसच्या केट फू कुनेचा समावेश केला होता. मात्र, डोपिंगमुळे कुनेवर जुलैपासून बंदी घालण्यात आली आहे. यामुळेच बीडब्ल्यूएफने एंट्री लिस्ट व्यवस्थित करून स्पर्धेचा दुसऱ्यांदा ड्रॉ काढला.
