राजापूर अर्बन बँकेला सन 2022-23 आर्थिक वर्षात 5 कोटी 5 लाखाचा ढोबळ नफा

0

राजापूर : कोरोना संकटानंतर आर्थिक भरारी घेताना राजापूर अर्बन को. आपॅ. बँकेने आपली यशस्वी घौडदौड कायम राखली आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात बँकेचा एकत्रित एकूण व्यवसाय 650 कोटींकडे नेताना या आर्थिक वर्षात बँकेने 5 कोटी 5 लाख इतका ढोबळ नफा मिळविला आहे. तर बँकेने आधुनिक सेवा सुविधांमध्ये पुढचे पाऊल टाकत आपल्या ग्राहकांसाठी युपीआय (क्युआर कोड) प्रणाली सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तशी माहिती बँकेचे अध्यक्ष हनिफ मुसा काझी व मुख्यकार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

राजापूर अर्बन बँकेच्या सन 2022-23 या आर्थिक वर्षातील प्रगतीबाबत माहिती देण्यासाठी सोमवारी बँकेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काझी व अहिरे यांनी या आर्थिक वर्षतील बँकेने केलेल्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला.

भविष्यात म्हणजे पुढील वर्षभरात बँकेचा एकत्रित व्यवसाय एक हजार कोटींवर नेताना बँकेचे शेडयुल बँकेत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला जाणार असून तालुक्यात बँकेची मिनी काऊंटर सुरू करण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष काझी यांनी सांगितले. बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि हितिचंतक यांच्या भक्कम पाठबळामुळे बँकेने आपल्या प्रगतीचा आलेख चढता ठेवल्याचे काझी यांनी नमुद केले. बँकेकडून पाच लाख व त्यापेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्या कर्जदारांच्या कर्जाला विमा सरंक्षण देण्याचा निर्णय बँकेने घेतला असून त्याची अंमलबजावणी केली जाणार असून भविष्यात सरसकट सर्वच कर्जदारांना कर्ज घेताना विमा उतरवीणे बाबत बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. जेणेकरून कर्जदाराच्या पश्चात बँकेला कर्जवसुलीत अडचण येणार नाही याची खबरदारी म्हणून हा पर्याय निवडण्यात येणार असल्याचे काझी यांनी सांगितले.

बँकेने या आर्थिक वर्षात आपल्या प्रगतीच्या आलेखाची कमान चढती ठेवली आहे. 407 कोटी 56 लाख इतका ठेवींचा टप्पा गाठताना या आर्थिक वर्षात सुमारे ५५ कोटींची वाढ केली आहे. तर कर्जामध्ये सुमारे रु. ३८ कोटी इतकी वाढ करून एकूण कर्ज रक्कम रु. २४९ कोटी ५६ लाख इतके केले आहे. त्यामुळे बँकेचा एकत्रित एकूण व्यवसाय हा ६५० कोटींहून अधिक इतका करण्यात बँकेला यश प्राप्त झाले आहे. आर्थिक वर्षात १८५० इतक्या सभासदांची वाढ होऊन बँकेची एकूण सभासद संख्या ही २७,५७५ इतकी झाली आहे. राखीव निधीमध्ये रु.८५ लाखाची वाढ होऊन ते रक्कम रु. २२ कोटी ५० लाख इतका राखीव निधी झालेला आहे. बँकेने आर्थिक वर्षात सुमारे रु. १५ कोटींचीगुंतवणूकीत वाढ करून वर्ष अखेर सुमारे रक्कम रु. १५७ कोटी इतकी गुंतवणूक केली असल्याचे काझी यांनी सांगितले.

कर्ज पुरवठा करताना त्याच्या वसुलीतही सातत्य राखले आहे. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण कमी राखण्यात यश प्राप्त केलेले असून बँकेचा ढोबळ एन.पी.ए. हा १.३१% इतका असून गेले १३ वर्षे सातत्याने ०.००% एन.पी.ए. बँकेने राखला आहे. बँकेचे रिझर्व्ह बँक व शासनाच्या निकषानुसार कर्जाचे ठेवीशी प्रमाण (सी.डी. रेशो) ६१.२३% पर्यंत ठेवण्यात यश आले आहे. हे यश प्राप्त करण्यामध्ये बँकेच्या दहाही शाखांनी नियोजनबद्ध योगदान देऊन आपल्या शाखेचा आलेख उंचावत ठेवला.

बँकेची सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथी व बँकेची अकरावी शाखा तळेरे येथे तर रत्नागिरी जिल्ह्यातील आठवी व बँकेची बारावी शाखा मौजे शृंगारतळी (गुहागर) येथे या आर्थिक वर्षात सुरू होणार आहे. आपल्या ग्राहकांना आधुनिक सेवा पुरवीताना आता बँकेने युपीआय (क्युआर कोड पेमेंट ) प्रणालीचा वापर सुरू केला असून सर्व ग्राहकांना आता या सेवेचा लाभ घेतला येणार आहे. तर आपल्या मोबाईल व्हॉटसॅप नंबरवरूनही पेमेंट करण्याच्या पर्यायाची सोय ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे काझी यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ संचालक जयंत अभ्यंकर यांसह संजय ओगले, अनिलकुमार करंगुटकर, राजेंद्र कुशे, किशोर जाधव, दिनानाथ कोळवणकर, अनामिका जाधव, प्रतिभा रेडीज, विवेक गादीकर, बँकेचे अधिकारी प्रसन्न मालपेकर, रमेश काळे, लक्ष्मण म्हात्रे आदी उपस्थित होते.

कोरोना काळात कोणत्याही कर्जदाराला कर्ज माफी नाही-हनिफ काझी
नुकत्याच झालेल्या बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीत बँकेकडून कोरोना काळात काही कर्जदारांना कर्ज माफी केल्याचा मुद्दा प्रचारात पुढे आला होता. याबाबत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अध्यक्ष काझी यांनी हा मुद्दा खोडून काढला. अशा प्रकारे बँकेने व संचालक मंडळाने कोणत्याही कर्जदाराला कर्जमाफी दिलेली नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाप्रमाणे त्या काळात पात्र ठरलेल्या कर्जदारांना कर्जाची परतफेड करण्यासाठी मोरेटीयम कालावधी दिलेला होता व तशी तरतुद करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे बँकेच्या त्या पात्र कर्जदारांना कर्ज परतफेडीसाठी मोरेटीयम कालावधी देताना त्यांच्या कर्जाची तरतुद बँकेने केली होती. मात्र कोरोना कालावधी नंतर आता अशा कर्जदारांकडून नियमित कर्ज परतफेड सुरू झालेली असून तरतुद केलेली रक्कम नफ्यात वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे अशी कोणतीही कर्ज माफी बँकेने दिलेली नाही असे नमुद करताना बँकेचा कारभार हा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियम आणि निर्देशाप्रमाणे चालतो असेही काझी यानी नमुद केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:59 04-04-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here