नवी दिल्ली : धाकड गर्ल म्हणून ओळख असलेल्या बबिता फोगाट आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल कुस्तीपट्टू बनवण्यात मोलाचा वाटा उचलणारे त्यांचे वडील महावीर फोगाट या दोघांनी आज (दि.१२) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भारताच्या अव्वल महिला कुस्तीपट्टू फोगाट भगिनी आणि त्यांना वडील महावीर फोगाट यांच्यावर बॉलिवूड स्टार आमिर खानने चित्रपट निर्मिती केली होती. त्यानंतर फोगाट कुटुंबिय प्रकाश झोतात आले होते. आता या कुटुंबातील दोन सदस्यांनी भाजप प्रवेश करत राजकारणाच्या आखाड्यात शड्डू ठोकला आहे. पण, राजकीय शड्डू ठोकण्याची फोगाट कुटुंबियांना ही पहिली वेळ नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महावीर फोगाट यांनी अजय चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाची कास धरली होती. त्यांना पक्षाने क्रीडा विभागाचे प्रमुखही करण्यात आले होते पण, लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने त्यांनी पक्ष बदलला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बबिता फोगाटने प्रतिक्रिया देताना, ‘मी नरेंद्र मोदींची मोठी फॅन आहे. आजपासूनच नाही तर जेव्हापासून त्यांनी पंतप्रधान पदाची सुत्रे हातात घेतली आहेत तेव्हापासूनच मी त्यांची फॅन आहे. त्यांच्या कामाचा माझ्यावर प्रभाव आहे.’ तसेच भाजपच्या नेत्यांनी आपल्या पक्षात स्थान दिल्याने बबिताने आभार मानले आहेत. तसेच महावीर फोगाट यांनी ‘ भाजप सरकार चांगले काम करत आहे. काश्मीरला लागू केलेले ३७० कलम रद्द केले. तसेच हरियाणा सरकारने युवकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये चांगल्या पद्धतीने सामावून घेतले आहे.’ असे वक्तव्य करत भाजप सरकारचे कौतुक केले.
