लांजातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन घरी

लांजा : तालुक्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण म्हणून नोंद झालेल्या आरगाव येथील दोन लहान मुलांपैकी नऊ वर्षांच्या मुलीवर पंधरा दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले. कोरोनावर मात केल्याबद्दल गावामध्ये तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, तिच्या लहान भावाचा शेवटचा चाचणी अहवाल येणे बाकी असून तो देखील कोरोना मुक्त होण्याची शक्यता आहे, तसे झाल्यास तालुक्यासाठी ती दिलासादायक देणारी बाब ठरणार आहे. कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर मुंबई भांडुप येथील पाचजणांचे कुटुंब आपल्या मूळ गावी म्हणजे आरगावला ८ मे रोजी परतले होते. तत्पूर्वी त्यांची लांजा येथे स्वब चाचणी करण्यात आली होती. त्याचे नमुने ११ मे रोजी सायंकाळी आले होते. या पाच जणांपैकी दोन लहान मुलांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या दोन्ही भावंडांवर गेले पंधरा दिवस रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी नऊ वर्षांच्या मुलीवर झालेले उपचार यशस्वी ठरले आहेत. तिच्या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्याने तिला घरी सोडण्यात आले. तालुक्यातील पहिल्या कोरोना बाधित झालेल्या आरगाव येथील दोन पैकी एका लहान मुलीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुक्यासाठी ही एक समाधानाची बाब ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here