बालविवाह लावाल तर खबरदार!, रत्नागिरी बालविकास विभागाची अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताकडे राहणार करडी नजर

0

रत्नागिरी : अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साडेतीन मुहूर्त एक महत्त्वाचा मुहूर्त असल्याने विवाहासाठीही हा मुहूर्त साधला जातो; मात्र याचे औचित्य साधून जिल्ह्यात बाल विवाह होणार नाहीत ना, याकडे बालविकास विभागाची करडी नजर राहणार आहे.
असे विवाह जिल्ह्यात आढळल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे.

बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. भारतात बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ हा कायदा करण्यात आला आहे. दि.१ नोव्हेंबर २००७ पासून हा कायदा अंमलात आला. बालविवाहाचा सामाजिक स्वास्थ्यावर दूरगामी परिणाम दिसून येतो. कायद्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण नसेल व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण नसेल आणि विवाह झाला असेल तर तो बालविवाह ठरतो. राज्यात अक्षय तृतीया हा सण शुभमुहूर्त मानला जातो आणि या मुहूर्तावर बहुतांश बालविवाह केले जातात.

बालविवाह केल्यास कायद्यानुसार एक लाख रुपये दंड आणि दोन वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. बालविवाह झाल्यास नातेवाईक, बालविवाह झालेल्या जागेचे मालक, बालविवाह लावून देणारे धर्मगुरू यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.
२२ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होत असल्यास ग्रामसेवक, बालविकास प्रकल्प अधिकारी, जवळचे पोलिस स्टेशन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईन (१०९८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. बी. काटकर आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृद्धी अजय वीर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 22-04-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here