रत्नागिरी : कोल्हापूर सांगलीमध्ये पुरामुळे हाहाकार उडालेला संपूर्ण देश उघड्या डोळ्यांनी पहात आहे. हजारो हात मदतीसाठी सरसावले आहेत. असे असताना रत्नागिरीतील मुस्लीम बांधव देखील मागे राहिले नाहीत. आपल्या महत्वपूर्ण आनंदाच्या सनात देखील त्यांनी माणुसकी जिवंत ठेवली. आपत्तीमध्ये जात धर्म न पाहता माणुसकीचा धर्म पाळण्याची भारताची परंपरा आहे. ही परंपरा पुढे नेत रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी सोमवारी होणारी बकरी ईद साधेपणाने साजरी करताना सांगली, कोल्हापूर येथील पुरग्रस्थांच्या मदतीसाठी आर्थिक मदतीसह वस्तुरूपाने साहाय्य केले. मनुष्याला मदत केली की ती परमेश्वराच्या चरणीच रुजू होते याचे उत्तम उदाहरण रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी घालून दिले आहे.सकाळी नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन पुरग्रस्थांसाठी आर्थिक मदतीसह कपडे, अन्य सामान एकत्र केले असून ते पुरग्रस्थाना देण्यात येणार आहे. या पवित्र कार्याने मानवता हाच खरा धर्म हे ब्रीद जप्त मुस्लिम बांधवांनी समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.
