रत्नागिरी : शासन सेवेत वयाच्या ३५ व्या वर्षापूर्वी आलेल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना त्याच्या वयाची पन्नाशी पूर्ण होताच निवृत्त करण्यात येणार आहे. तर वयाच्या पस्तिशीनंतर सेवेत आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने नुकतेच एक परिपत्रक काढले असून या परिपत्रकातवयाच्या ५५ व्या वर्षी निवृत्त करण्यात येणार आहे. त्यामुळे अकार्यक्षम, संशयास्पद असणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना निरोपाचा नारळ देण्यात येणार आहे. नमूद केल्यानुसार वयाची पन्नाशी ओलांडली अथवा सेवेची ३० वर्षे झाली की निवृत्ती घ्यावी लागणार आहे. त्यात तो अधिकारी वा कर्मचारी कितव्या वर्षी सेवेत आला याचे मूल्यमापन होणार आहे. त्यानुसार ५०/५५ असा वयाचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. त्यात सेवेची ३० वर्षे आणि वयाची ५० अथवा ५५ वर्षे यातील आधी पूर्ण होणारी अट पाहिली जाणार आहे. थोडक्यात, मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याबाबत एकत्रित कार्यपद्धती राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. प्रत्येक कॅलेंडर वर्षात दि. १ ऑगस्ट रोजी वयाची ४९ वा ५४ वर्षे किंवा सेवेची ३० वर्षे पूर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सूची तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. या सूचीतील अधिकारी वा कर्मचाऱ्यांच्या त्या वर्षीच्या ३१ मार्चपर्यंत कामकाजाबाबत गोपनीय अहवाल परिपूर्ण असावेत, अशीही अट घालण्यात आली आहे. शासनसेवा पुढे सुरू ठेवण्यासाठी पात्रता पाहण्यात येणार आहे. गट अ, ब(राजपत्रित, अराजपत्रित) अधिकारी आणि गटक क कर्मचाऱ्यांची शारीरिक क्षमता, प्रकृतिमान, निर्विवाद सचोटी, कार्यमूल्यमापन करण्यात येणार आहे.त्यातून जो अहवाल तयार करण्यात येणार त्यावर त्या अधिकारी वा कर्मचाऱ्याची सेवा ठरणार आहे. गट ड मधील कर्मचाऱ्यांचेही मूल्यमापन होणार आहे. त्यानुसार कोण सेवा करण्यास पात्र आहे वा कोण अपात्र आहे, हे ठरणार असून त्यावरच अधिकारी वा कर्मचाऱ्यांचे भवितव्य ठरणार आहे. कर्मचारी वा अधिकाऱ्यांचे पुनर्विलोकन होणार असल्याने त्यांचा कामकाज, वर्तणूक अहवाल कसा असणार, त्यावर सेवा काळाची मुदत ठरणार आहे. मात्र वयाची पन्नाशी ओलांडली अथवा सेवेची ३० वर्षे झाली की निवृत्ती घ्यावी लागणार आहे.
